पुणे (हवेलीनामा वृतसमूह): पुणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये सातत्याने वाढणाऱ्या घरफोडी, दरोडा, जबरी चोरी आणि वाहन चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी तसेच दाखल गुन्हे लवकरात लवकर उघडकीस आणण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला कडक निर्देश दिले होते. या मार्गदर्शनाखाली पुणे ग्रामीण पोलिसांच्या पथकाने अत्यंत धडाकेबाज कारवाई करत एका सराईत गुन्हेगाराला आणि एका विधिसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून तब्बल १२ गंभीर गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यांच्याकडून सुमारे १० तोलांचे सोन्याचे दागिने, दोन मोटरसायकल आणि मोबाईल फोन असा एकूण १५,५०,०००/- रुपये** किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
दिनांक ०१/११/२०२६ रोजी पोलीस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज व त्यांच्या पथकातील अधिकारी व अंमलदार हे इंदापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना, त्यांना गोपनिय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, घरफोडी व चोरीच्या गुन्ह्यांमधील संशयित मोबाईल उर्फ हरी पवार, राहुल उर्फ चिल्ल्या मंगेश काळे व महेश उर्फ मावढ्या मंगेश काळे हे इंदापूर येथे येणार आहेत. या माहितीच्या आधारे पुणे-सोलापूर बायपास रोडवरील जगदंब हॉटेलजवळ सापळा रचण्यात आला. काही वेळातच मोटरसायकलवरून तीघे जण तेथे आले आणि पोलिसांची चाहूल लागताच त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी प्रसंगावधान दाखवत आवश्यक व वाजवी बळाचा वापर करून त्यांना ताब्यात घेतले. पकडलेल्यापैकी एकाची चौकशी केली असता त्यांनी आपले नावे मोबाईल उर्फ हरी पवार (वय २२ वर्षे, रा. सुगाव भोसें, ता. पंढरपूर) व एक विधिसंघर्षग्रस्त बालक असल्याचे सांगितले. त्यांच्याकडील मोटरसायकलबाबत विचारपूस केली असता ती चोरीची असल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांनी केलेल्या सखोल तपासात व गुन्ह्यांच्या अनुषंगाने चौकशी केली असता, त्यांनी व त्यांचे साथीदार शक्तिमान हुबऱ्या काळे (वय २२ वर्षे, रा. माळेगाव, ता. बारामती) व विधिसंघर्षग्रस्त बालकाने मिळून पुणे ग्रामीण आणि सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात खालीलप्रमाणे गंभीर गुन्हे केल्याची कबुली दिली:
1. दरोडा (१ गुन्हा)
2. जबरी चोरी (१ गुन्हा)
3. घरफोडी (८ गुन्हे)
4. मोटरसायकल चोरी (सोलापूर ग्रामीण – २ गुन्हे)
ही कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार (बारामती विभाग), अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार (पुणे विभाग), उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम (बारामती उपविभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, पोलीस निरीक्षक विलास नाळे (इंदापूर पोलीस स्टेशन), वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनकडील सपोनी जीवन मोहिते, पोसई मुलाणी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोसई सुधीर वाळुंज, पोसई बाळासाहेब कारंडे, पोसई विनोद भोकरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार शिवाजी निकम, किशोर तेलंग, सचिन होळकर, गुलाबराव पाटील, स्वप्निल अहिवळे, पोपट नाळे, शैलेश स्वामी, सुलतान डांगे, तुषार चव्हाण, गणेश डेरे, रहीस मुळानी, राजू मोमीन, अतुल डेरे, चेतन पाटील, भारत मोहोळ, इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार संतोष शिंदे, अंकुश माने, राहुल शिंदे, लक्ष्मण सूर्यवंशी, योगेश कर्चे, विनोद लोखंडे, सचिन नांगरे, आण्णा कोळेकर व वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनकडील पोलीस अंमलदार पो.हवा. खेडकर, पो.हवा. खांडेकर, पो.हवा. देवकर, पो.कॉ. जाधव, पो.कॉ. यादव, पो.कॉ. धात्रे, पो.कॉ. भोसले, पो.कॉ. परगे, पो.कॉ. येताळे यांनी केली असून, गुन्ह्याचा पुढील तपास दौंड पोलीस स्टेशन करीत आहे.
