अतुल देशपांडे,

सातारा (हवेलीनामा प्रतिनिधी) ऊसाला वाढीव दर मिळावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सुरू केलेल्या चक्काजाम आंदोलनाचा दुसऱ्या दिवशीही तिढा कायम आहे. पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर साताऱ्यातील नागठाणे आणि कोल्हापूर जिल्ह्यातील किणी टोलनाका येथे शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन सुरू ठेवल्याने महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. दरम्यान, साताऱ्यात ऊसाने भरलेला ट्रॅक्टर पेटविण्यात आल्याची घटना मध्यरात्री घडल्याने आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून आंदोलन अधिक चिघळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी सकाळी ११ वाजल्यापासून या आंदोलनाला सुरुवात झाली. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य दर मिळावा, यासाठी संघटनेने पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला आहे. बुधवारी आंदोलनाचा दुसरा दिवस असून तब्बल ३६ तासांपासून शेतकरी महामार्गावर ठाण मांडून आहेत. किणी टोलनाका परिसरात राजू शेट्टी यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. विविध संघटनांनीही आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *