पुणे (विशेष प्रतिनिधी): राज्यभरात प्लास्टिकच्या वापरावर कायदेशीर बंदी असतानाही, सणासुदीच्या काळात बाजारपेठेत प्लास्टिकच्या वस्तूंचा अक्षरशः खच पडला आहे. विशेषतः दिवाळीचा सण साजरा करण्यासाठी आवश्यक असलेले आकाशकंदील, विविध प्रकारच्या सजावटीचे हार, झिरमाळ्या, प्लास्टिकची फुले आणि तोरणे यांसारख्या सर्वच वस्तू मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक व थर्माकोलपासून बनवलेल्या बाजारात विकल्या जात आहेत. हा सण संपल्यानंतर एवढे सगळे प्लास्टिक नेमके कुठे टाकले जाणार? यामुळे नद्या आणि कचऱ्याच्या ढिगाऱ्यात प्रचंड भर पडणार असून, यावर शासन किंवा प्रशासन कधी नियंत्रण ठेवणार की नाही, असा संतप्त सवाल पर्यावरणप्रेमी व नागरिकांमधून विचारला जात आहे.
* बाजारात प्लास्टिकच्या सजावटीचा मुक्त वापर
शासनाने पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी आणि प्रदूषण रोखण्यासाठी प्लास्टिक पिशव्या आणि तत्सम प्लास्टिक उत्पादनांवर बंदी घातली आहे. मात्र, प्रत्यक्षात चित्र पूर्णपणे वेगळे आहे. सध्या दिवाळीच्या खरेदीसाठी गजबजलेल्या बाजारपेठा प्लास्टिकमय साहित्याने गच्च भरल्या आहेत. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी प्लास्टिकपासून बनवलेले रंगीबेरंगी आकाशकंदील, दारासाठीची तोरणे, प्लास्टिकच्या फुलांचे हार आणि सजावटीचे साहित्य सर्रास विकले जात आहे. बंदी केवळ कागदावरच असून प्रत्यक्षात या वस्तूंची लाखो रुपयांची खपत खुलेआम सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.

* उत्सवानंतर कचऱ्याची गंभीर समस्या आणि पर्यावरणाचा -हास
सण संपल्यानंतर या हजारो टन प्लास्टिकचे काय करायचे, हा एक मोठा प्रश्न निर्माण होतो. कचऱ्याच्या ढिगाऱ्यात भर: दिवाळीच्या आनंदानंतर हे सर्व प्लास्टिक फेकून दिले जाते, ज्यामुळे गावोगावी आणि शहरांमध्ये कचऱ्याचे प्रचंड ढीग साचतात. अनेकदा हा कचरा उघड्यावर किंवा नद्या, पाण्याच्या स्रोतांमध्ये जाऊन पडतो, ज्यामुळे जलप्रदूषण वाढते आणि जलचर प्राण्यांच्या तसेच पर्यावरणाच्या जीवाला मोठा धोका निर्माण होतो. प्लास्टिक हे सहजासहजी नष्ट होत नसल्याने शेकडो वर्षे ते निसर्गात तसेच राहून मातीची व पर्यावरणाची अपरिमीत हानी करते.सध्या यापैकी बराच कचरा शेतापर्यंत येऊन पोहोचला आहे. शेतीचा पोत सुधारण्यासाठी कंपोस्ट खत उपयोगी पडतो परंतु येथे प्लास्टिक कचरा शेतात पडत असल्यामुळे शेती धोक्यात आली आहे.
*प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह; कारवाईची मागणी –
एका बाजूला शासन पर्यावरण रक्षणाचे दावे करत असताना, दुसरीकडे घाऊक आणि किरकोळ बाजारात प्लास्टिकच्या अशा वस्तुकृत साहित्याची होणारीविक्री रोखण्यात प्रशासन अपयशी ठरत आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. घाऊक विक्रेते आणि उत्पादकांवर कठोर कारवाई केल्याशिवाय या समस्येवर मात करता येणार नाही.
दिवाळीसारख्या पवित्र सणात पर्यावरणाचा घात करणाऱ्या या प्लास्टिकच्या वापरावर प्रशासनाने तात्काळ धडक कारवाई करावी आणि पर्यावरणाचा संचय करण्यासाठी कठोर पावले उचलावीत, अशी मागणी आता सर्वसामान्य नागरिकांमधून व पर्यावरणप्रेमींकडून केली जात आहे.
