पुणे (हवेलीनामा प्रतिनिधी): वाघोली पोलीस स्टेशनच्या हद्दीत गुन्हे प्रतिबंधक गस्त घालत असताना, तडीपार आदेशाचा भंग करून बेकायदेशीरपणे हद्दीत आलेले आणि हातात कोयते घेऊन हवेत फिरवून परिसरात दहशत माजवणारे दोन सराईत गुन्हेगार वाघोली पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहेत. वाघोली पोलिसांच्या तपास पथकाने अत्यंत शिताफीने सापळा रचून या दोघांना जेरबंद केले असून त्यांच्याकडून दोन लोखंडी पात्याचे कोयते जप्त करण्यात आले आहेत.

दिनांक ०४/११/२०२६ रोजी वाघोली पोलीस स्टेशनकडील पोलीस उपनिरीक्षक (PSI) राघू, पोलीस अंमलदार (PC) व्यवहारे, शिंदे व घावटे हे पोलीस स्टेशन हद्दीत गस्त घाबत होते. दरम्यान, पीसी ऋषिकेश व्यवहारे व पीसी अमोल घावटे यांना गुप्त बातमीदारा मार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की, वाघोली पोलीस स्टेशनकडील रेकॉर्डवरील तडीपार आरोपी ओम दादाराव म्हस्के (वय २१ वर्षे, रा. दुबेनगर, वाघोली, पुणे) आणि त्याचा साथीदार रेकॉर्डवरील आरोपी अथर्व दत्तात्रय येवले (वय १९ वर्षे, रा. शिवसाई सोसायटी, लोहगाव चौक, वाघोली, पुणे) हे दोघेजण आव्हाळवाडी रोडवरील गारवा हॉटेलसमोर थांबले असून त्यांच्याकडे कोयते आहेत व ते ते हवेत फिरवून दहशत माजवत आहेत. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी सापळा रचून पाठलाग केला आणि दोन्ही आरोपींना शिताफीने ताब्यात घेतले.

याचे गुन्हे अभिलेख तपासले असता त्याच्यावर वाघोली व लोणीकंद पोलीस ठाण्यात एकूण ७ गंभीर गुन्हे नोंद असल्याचे निष्पन्न झाले आहे. इतकेच नव्हे तर, यापूर्वी त्याच्यावर ‘एमपीडीए’ (MPDA) कायद्यांतर्गत देखील कारवाई करण्यात आलेली आहे. पोलीस उपायुक्त, परिमंडळ-०७, पुणे शहर यांच्याकडील आदेश क्रमांक २६/२०२६ नुसार दिनांक ०४/०८/२०२६ रोजी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ५६(१)(अ)(ब) अन्वये ओम म्हस्के यास पुणे शहर व पिंपरी-चिंचवड आयुक्तालय अशा संपूर्ण पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले होते. मात्र, या आदेशाचा भंग करून तो अनाधिकृतपणे आणि विनापरवाना हद्दीत आला होता.सहकारी आरोपी – अथर्व दत्तात्रय येवले: याचेवरही पूर्वी आर्म कायद्यान्वये (Arms Act 4(25)) गुन्हा नोंद असल्याचे समोर आले आहे.

पोलिसांनी पकडलेल्या दोन्ही आरोपींची अंगझडती घेतली असता, त्यांच्या ताब्यातून दोन लोखंडी पात्याचे धारदार कोयते मिळून आले. या प्रकरणी वाघोली पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३(५), भारतीय हत्यार कायदा कलम ४(२५), महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१)(२)(३) सह १३५ आणि क्रिमिनल लॉ अमेण्डमॅन्ट ॲक्ट १९३२ चे कलम ७ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदरची ही धडक कारवाई पोलीस उपायुक्त अमितेश कुमार, सहायक पोलीस आयुक्त अनिता मोरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, पोलीस निरीक्षक (गुन्हे) मंगेश जगताप, पोलीस निरीक्षक पल्लवी मेहेर** यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिवशंकर राघु, बाळासाहेब मोराळे, ऋषिकेश व्यवहारे, योगेश शिंदे, अमोल घावटे, अशोक शेळके,पांडुरंग माने,समीर भोरडे,राहुल गोरे,अमोल सरतापे,महादेव कुंभार,मारुती वाघमारे,विशाल गायकवाड व गहिनीनाथ बोयणे यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *