पुणे (हवेलीनामा वृतसमूह) हवेली तालुक्यात ओढवलेल्या अथवा संभाव्य दुष्काळी परिस्थितीवर यशस्वीरीत्या मात करण्यासाठी पंचायत समिती हवेलीच्या वतीने विविध उपाययोजनांचा सर्वसमावेशक कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. पंचायत समिती सभापती युवराज काकडे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (दि. २) रोजी पार पडलेल्या दुष्काळ निवारण नियोजन बैठकीत जलसंधारण, बंधाऱ्यांचे खोलीकरण, नवीन बंधारे उभारणी आणि जळीत व्यवस्थापनाबाबत सविस्तर चर्चा करून ठोस नियोजन करण्यात आले.
या बैठकीत विविध शासकीय विभागांचे अधिकारी, पंचायत समितीचे पदाधिकारी तसेच नाम व बायफसारख्या प्रतिष्ठित सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तालुक्यातील अस्तित्वातील बंधाऱ्यांचे खोलीकरण, नवीन बंधाऱ्यांची उभारणी, तसेच ओढे-नाल्यांचे खोलीकरण व अस्तरीकरण करण्याचे नियोजन यादरम्यान करण्यात आले.
कृषी विभागाने जलसंधारण व मृदसंधारणाच्या योजनांची माहिती दिली. तसेच तालुक्यातील प्रत्येक गावात शाळा, महाविद्यालये व तरुण मंडळांच्या सहभागातून ‘वनराई बंधारे’ उभारले जाणार आहेत. सर्व शासकीय इमारतींमध्ये पावसाच्या पाण्याचा संचय करण्यासाठी ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ व्यवस्था अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला गेला.तसेच पाणी व्यवस्थापन व जलसंधारणाबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती व्हावी म्हणून शाळा-महाविद्यालयांमध्ये तालुकास्तरीय निबंध, चित्रकला व वक्तृत्व स्पर्धा आयोजित करून विजेत्यांना सन्मानित केले जाणार आहे.
जमिनीमध्ये नैसर्गिकरीत्या पाण्याचे पुनर्भरण व्हावे, यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा ‘जलतारा’ प्रकल्प’ पंचायत समिती हवेली, कृषी उत्पन्न बाजार समिती (पुणे) आणि नाम फाउंडेशनच्या सहकार्याने सुरू करण्यात येत आहे. पुढील आठवड्यापासूनच या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती सभापती युवराज काकडे यांनी दिली. जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत याचा शुभारंभ केला जाईल.
मल्हार नानासाहेब पाटेकर यांनी तालुक्यातील जलसंधारणाच्या कामांसाठी जेसीबी यंत्र नाममात्र दरात उपलब्ध करून देण्याची घोषणा केली. १७ राज्ये व २७ जिल्ह्यांत कार्यरत असलेल्या बायफचे शास्त्रज्ञ डॉ. मनोज कुमार आवारे यांनी चारा व्यवस्थापन व पशुधन संवर्धनाबाबत मोलाचे मार्गदर्शन केले.आणि आदर पुनावाला फाउंडेशनच्या प्रतिनिधींनी शुद्ध पाणीपुरवठ्याबाबत माहिती देत विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचे आश्वासन दिले.
जिल्हाधिकाऱ्यांना हवेली तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्याबाबत बैठक पार पडल्यानंतर उपस्थित सर्व पदाधिकारी व सदस्यांनी थेट जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची भेट घेतली. हवेली तालुक्यात निर्माण झालेल्या दुष्काळी स्थितीची गांभीर्याने दखल घेऊन हवेली तालुक्याचा समावेश अधिकृतपणे दुष्काळग्रस्त तालुक्यात करण्यात यावा अशा आशयाचे निवेदन यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना सुपूर्द करण्यात आले.
या बैठकीस उपसभापती विद्या गायकवाड, गटविकास अधिकारी शेखर शेलार, जि.प. सदस्य रूपाली रमेश कोंडे, किरण साकोरे, पं.स. सदस्य सुदर्शन चौधरी, मनोज चौधरी, युवराज वांजळे, सुषमा मुरकुटे, राणी वाळके, मोनिका कंद, शुभांगी खिरीड, कोमल गणेश कांबळे, अमोल टेकाळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
