अतुल देशपांडे,
सातारा (हवेलीनामा प्रतिनिधी) ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व विचारवंत शहीद डॉ नरेंद्र दाभोलकर यांनी अंधश्रद्धा निर्मूलनाचा जो विचार कार्यकर्त्यांच्या मध्ये रुजवला त्यामुळेच त्यांच्या मृत्यूनंतरही अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ पुढे नेटाने सुरू राहिली आहे हे त्यांच्या कुशल संघटनात्मक कार्याचे गमक आहे असे प्रतिपादन जेष्ठ विचारवंत किशोर बेडकीहाळ यांनी सातारा येथे बोलताना व्यक्त केले.
शहिद डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या जयंतीनिमित्त सातारा येथील सुटा संघटनेच्या कार्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी विचार मंचावर सामाजिक कार्यकर्ते विजय मांडके व शिवाजी उदय मंडळाचे सुरेश पाटील उपस्थित होते
समाजवादी युवक दल या संघटनेत काम करत असताना सामाजिक प्रश्नांना वाचा फोडणे आणि तो प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे. प्रसंगी आंदोलन करणे यासारखे कार्यक्रम असो किंवा वैचारिक व्याख्यानाची तयारी असो अतिशय काटेकोर नियोजन कसे करावे हे डॉ दाभोलकर यांच्या कडूनच शिकायला मिळाले.त्यांच्यामुळे अनेक कार्यकर्ते घडत गेले. त्यांना दूरदृष्टी होती. कोणत्या गोष्टीची कसे परिणाम होतील हे ते चांगले जाणून होते आणि त्यामुळेच कोणताही विषय ते अतिशय संवेदनशील पद्धतीने विचार करून सोडवण्याचा प्रयत्न करत. त्यामुळेच त्यांच्याबरोबर सगळी आंदोलने यशस्वी होत असत असेही आपल्या अनुभवात त्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना विजय मांडके यांनी कांची कामकोटी पिठाचे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांना भेटण्यास भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी आल्या होत्या. त्यावेळी समाजवादी युवक दलाने घेतलेल्या भुमिके विषयी माहिती दिली. आणि आजही त्याच भूमिकेतून काम करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले.
. डॉ. नरेंद्र दाभोलकर हे कुशल संघटक तर होतेच परंतु त्यांचे कार्यक्रमाचे नियोजन करण्यात व राज्यभरातील संघटनांशी व कार्यकर्त्यांशी समन्वय साधण्याचे कसंब अत्यंत चांगले होते असे विजय मांडके यांनी नमूद केले.
सुरेश पाटील यांनी कबड्डी खेळातील बारकावे डॉ. नरेंद्र दाभोलकर हे कबड्डी संघातील आम्हाला समजून सांगत असे सांगताना खेळात जिंकण्याचा विश्वासही त्यांच्याकडून मिळत असे. तसेच संपूर्ण शिवाजी उदय मंडळातील कार्यकर्त्यांना आजारपणामध्ये घरी येऊन औषध देणारा डॉक्टर अशी त्यांची वेगळी ओळख सांगितली.
कार्यक्रमास डॉ प्रसन्न दाभोलकर ,दिनकर झिंब्रे , प्रा. डॉ भास्कर कदम व चळवळीचे कार्यकर्ते उपस्थित होते. उदय चव्हाण यांनी प्रास्ताविक व सुत्रसंचलन केले. डॉ दीपक माने यांनी आभार मानले.
