किरण खुडे
राजगुरूनगर : (हवेलीनामा प्रतिनिधी) : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी राजगुरूनगर एसटी आगारामध्ये वृक्षारोपणाचा उपक्रम आयोजित करण्यात आला. हा राज्यस्तरीय उपक्रम आगाराच्या परिसरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सामाजिक कार्यकर्त्या वैशाली बाबाजी काळे, खेड पंचायत समितीच्या सभापती विद्या मोहिते, सदस्य दिलीप डुबे तसेच विविध सामाजिक कार्यकर्त्यांच्या हस्ते वृक्षारोपन करण्यात आले
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ७८ व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून एसटी महामंडळ राजगुरूनगर आगार यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात विविध सामाजिक संस्थांनी देखील सहभाग घेतला होता. एक झाड लावा भविष्य वाचवा, हिरव्यागार पृथ्वीचे स्वप्न वृक्षारोपणातून पूर्ण करूया, वृक्ष हेच जीवन – चला एक झाड लावूया, पर्यावरण संरक्षणासाठी अधिकाधिक वृक्ष लागवड करून जीवसृष्टीचे संवर्धन करूया, असे मत आपल्या मनोगतातून सभापती विद्या मोहिते यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे संयोजन आगारव्यवस्थापक श्रीमती विद्या कदम, सहाय्यक वाहतूक अधीक्षक तुकाराम पवळे, वाहतूक निरीक्षक प्रविण तुपसांगवे, सहाय्यक वाहतूक निरीक्षक एम. एफ. सय्यद यांनी केले.
यावेळी शिवसेना महिला आघाडीच्या उर्मिला सांडभोर, दिलीप तापकीर, वरीष्ठ लिपीक स्नेहा कातोरे, राजेश दौंडकर, विजया बगाटे, स्वाती बिराजदार, पुष्पा चासकर,अर्चना शिंदे, वाहतूक नियंत्रक विष्णू राठोड, राम चव्हाण, राजेश कांबळे, अमित जगताप, नितिन पवार, दत्तात्रय बांगर, हेमंत कुडीया आदी उपस्थित होते.
यावेळी एसटी आगाराच्या परिसरात वेगवेगळ्या फळांची फुलांची तसेच औषधी रोपांची लागवड करण्यात आली. तसेच या रोपांचे संवर्धन व जतन करण्याचा संकल्पदेखील यावेळी उपस्थितांनी केला. या कार्यक्रमासाठी एसटी महामंडळासह सामाजिक संस्थांनीही पुढाकार घेतला.
भविष्यातही अशा उपक्रमांद्वारे हरित पर्यावरणाच्या जतनासाठी सर्वांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन यावेळी उपस्थितांकडून करण्यात आले.
