पुणे (हवेलीनामा) चाकण उत्तर पोलीस स्टेशन येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक यांचेवर पाच लाखाची लाच मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तानाजी शिवाजी कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक, चाकण उत्तर पोलीस स्टेशन, पिंपरी चिंचवड आयुक्तालय (वर्ग-2) यांचे विरुद्ध निगडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
याविषयी माहिती अशी की, तक्रारदार हे पुणे परिसरात जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय करतात. तक्रारदार आणि त्यांचा मुलगा यांच्या विरोधात जमीन खरेदी विक्री व्यवसायाच्या अनुषंगाने चाकण उत्तर पोलीस स्टेशन, पिंपरी चिंचवड आयुक्तालय येथे दोन तक्रार अर्ज आहेत. तानाजी कदम हे चाकण उत्तर पोलीस स्टेशन येथे कार्यरत असून तक्रारदार व त्यांच्या मुलाच्या विरुद्धचे दोन्ही तक्रार अर्ज त्यांच्याकडे चौकशीला होते. दोन्ही तक्रार अर्ज वरिष्ठांना सांगून दिवाणी स्वरूपाचे असल्याचे दाखवून निकाली काढण्यासाठी कदम यांनी वरिष्ठांसाठी तक्रारदाराकडे 10,00,000/- रुपये लाचेची मागणी केल्याची तक्रार अँटी करप्शन ब्यूरो, पुणे येथे दिली होती. तक्रार प्राप्त झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे मार्फत तक्रारीच्या अनुषंगाने लाच मागणी पडताळणी कारवाईदरम्यान कदम यांनी तक्रारदाराकडे प्रथम 10,00,000/- रुपयाची लाच मागणी करून तडजोडीअंती 5,00,000/- रुपयाच्या लाचेची मागणी केली तसेच पहिल्या टप्प्यात 2,50,000/- रुपये व तक्रारदाराविरुद्ध आलेला अर्ज निकाली काढल्यानंतर 2,50,000/- रुपये लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.
