थेऊर (हवेलीनामा) दिवसेंदिवस थेऊरमध्ये फटाका बुलेट्स च्या संख्येत वाढ होत असून याकडे पोलिसांकडून कारवाईची अपेक्षा असताना मात्र डोळेझाक होत आहे. परंतु यासर्व गोष्टीचा सर्वसामान्य थेऊरकर नागरिकांना मात्र मोठा मानसिक त्रास सहन करण्याशिवाय पर्याय उरला नाही. कायद्याचा धाक उरला की नाही हिच चर्चा थेऊरमध्ये आहे.
थेऊर हे अष्टविनायकापैकी एक तीर्थक्षेत्र असून राज्यातील विविध भागातून भाविक श्री चिंतामणी गणपती दर्शनाला येत असतात अशावेळी दिवसा रात्री अपरात्री बुलेट्स फटाका काढत गावातून सुमार सुसाट निघतात यामुळे नागरिकांची शांतता भंग होत आहे. थेऊर मध्ये लोणी काळभोर पोलीस स्टेशन अंतर्गत पोलीस चौकी असली तरीही या बुलेट्स वर कसलीच कारवाई होत नाही उलट यात वाढ होत आहे.
ग्रामीण पोलीस अंतर्गत हे गाव असताना अशा खोडसाळपणावर कठोर कारवाई करण्यात येत असे. परंतु शहर पोलिसांचा पोलिसी धाक राहिला नसल्याने गावातील जवळपास सर्वच बुलेट्स च्या सायलेंसर मध्ये बदल करून सामाजिक शांतता भंग केले जात आहे.यावर पुणे शहरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार विशेष लक्ष घालून यावर कारवाई करणार काय असा सवाल नागरिक विचारत आहेत.
