पुणे (हवेलीनामा) महसूल विभागातील गट क संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या नुकत्याच बदल्या चा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी पारित केल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने या सर्व बदल्या स्थगित करण्याच्या आदेश दिल्यानंतर सर्व कर्मचारी आपल्या पूर्वी नियुक्ती स्थळीच कार्यावर असणार आहेत.

पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डुडी यांनी आपल्या अधिकार क्षेत्रातून महसूल विभागातील गट क संवर्गातील जवळपास ८७ महसुली कर्मचाऱ्यांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या करण्याचे आदेश दि. १५ जून रोजी काढल्यानंतर या आदेशानुसार संबंधित कर्मचारी बदलीच्या ठिकाणी रुजू होणार का हा संभ्रम निर्माण झाला त्यावर राज्य निवडणूक आयोगाने नुकत्याच काढलेल्या आदेशानुसार या सर्व बदल्या रद्द करून संबंधित कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त न करण्याचे आदेश दिले आहेत.

महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे अधिनियम आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम 2005, हा अधिनियम दि.12 मे, 2006 पासून अंमलात आलेला आहे.या अधिनियमातील कलम 2 (ख) व कलम 6 नुसार गट क संवर्गातील सर्व कर्मचाऱ्यांचे समुपदेशनाची प्रक्रिया राबवून त्यानुसार जिल्हा स्तरीय नागरी सेवा मंडळच्या शिफारशीनुसार ग्राम महसूल अधिकारी, सहाय्यक महसूल अधिकारी, मंडल अधिकारी व महसूल सहाय्यक यांचे बदल्याबाबतचे आदेश निर्गमित करण्यात आलेले होते.परंतु मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांनी दिलेल्या निर्देशानुसार या बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना बदलीचे ठिकाणी रुजु रद्द समजण्यात यावा तसेच पुढील आदेशापर्यंत कार्यमुक्त करण्यात येऊ नये. तसेच केले असल्यास सदर कार्यमुक्त आदेश रद्द समजण्यात यावा असे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून परिपत्रक काढण्यात आले आहे.

मुख्य निवडणूक आयोगाने काढलेल्या पत्रकानुसार,राज्यातील वर्ग-३ व त्यावरील कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रस्तरीय पर्यवेक्षक / अधिकारी (बी एल ओ ) पर्यवेक्षक / अधिकारी) म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहे. त्यांच्याकडे संबंधित मतदान केंद्रातील सर्व मतदारांना गणना प्रपत्र वाटणे तसेच भरलेले प्रपत्र जमा करुन घेणे तसेच ते डिजीटाईज करणे इत्यादी कामे सोपविण्यात आलेली आहेत. ते सध्या मॅपिंग व इतर कामामध्ये व्यस्त आहेत व प्रत्यक्ष सखोल पुनरिक्षणाच्या कामामध्ये त्यांच्यावर अत्यंत महत्वाची जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. विशेषतः राज्यातील शिक्षक, तलाठी, ग्रामसेवक इत्यादी कर्मचाऱ्यांना वरीलप्रमाणे नियुक्ती देण्यात आलेली आहे. तसेच त्यांचे लॉगीन क्रेडेन्शियल तयार करण्यात आलेले असुन त्यांचे नाव व दुरध्वनी क्रमांक नमुद होऊन गणना प्रपत्र दिनांक २०.०६.२०२६ रोजी आयोगाकडुन उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. बी एल ओ /पर्यवेक्षक म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या कोणत्याही कर्मचाऱ्याच्या त्याच्या पदावरुन अन्यत्र बदली करण्यात येऊ नये याची दक्षता संबंधित सर्व प्रशासकीय विभागांनी घ्यावी, तसेच अशा प्रकारे बदल्या केल्या असल्यास सदर बदल्यांच्या अंमलबजावणीस विशेष सखोल पुनरिक्षणाचा कार्यक्रम संपेपर्यंत स्थगिती देण्यात यावी. याबाबत सविस्तर सुचना सर्व प्रशासकीय विभागांनी आपल्या अधिपत्याखालील कार्यालयांना देण्यात याव्यात असे सुचविण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *