पुणे (हवेलीनामा) वडिलोपार्जित जमिनीवर नोंद लावण्यासाठी चऱ्होली ग्राम महसूल अधिकाऱ्याने १ लाख ८० हजाराची लाच मागून तडजोडी नंतर ७० हजाराची लाच खाजगी व्यक्ती मार्फत स्वीकारली यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा कारवाई केली आणि त्यांना रंगेहात पकडले त्यांच्या विरुद्ध दिघी पोलिसांत गुन्हा नोंदणी करण्याची प्रक्रिया चालू आहे.
सुनील भिकाजी सातोसे असे चऱ्होली ग्राम महसूल अधिकाऱ्याचे नावं असून नेमाजी माधवराव भोकरे असे खाजगी व्यक्तीचे नावं आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहिती नुसार, यातील तक्रारदार यांचे आजोबांची चहोली बुद्रुक येथे वडिलोपार्जित जमीन आहे. त्यांच्या आजोबांचे निधन झाल्यानंतर या शेतजमिनीवर तक्रारदार यांचे वडील व तक्रारदारांचे काका यांची वारसनोंद लावण्यासाठी त्यांनी डिसेंबर २०२५ मध्ये चन्होली बुद्रुक ग्राम महसूल कार्यालय येथील अधिकारी सुनील सातोसे यांना अर्ज दिला होता. त्याबाबत तक्रारदारांनी वारंवार चौकशी करून देखील सातोसे यांनी तक्रारदार यांचे वडील व काका यांची जमिनीच्या 7/12 वर वारसनोंद केली नाही.
दिनांक 29/05/2026 रोजी तक्रारदार हे वारस नोंदणी बाबत परत एकदा चौकशी करण्याकरिता चहोली बुद्रुक ग्राम महसूल कार्यालय येथे गेले असता वारस नोंदीसाठी 1,80,000/- रुपयाच्या लाचेची मागणी करून तडजोड करून 80,000/- रुपये लाच मागणी केली अशी तक्रार दिनांक 01/06/2026 रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग पुणे येथे दिली होती. तक्रारीच्या अनुशंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिनांक 04/06/2026 रोजी केलेल्या लाच मागणी पडताळणी सातोसे यांनी तक्रारदारांकडून वरील काम करून देण्यासाठी 80,000/- रुपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती 70,000/- रुपये लाच मागणी करून ती खाजगी व्यक्ती नेमाजी भोकरे यांचेकडे देण्यास सांगितले.
दिनांक 08/06/2026 रोजी करण्यात आलेल्या सापळा कारवाईदरम्यान सुनील सातोसे यांचे सांगण्यावरून नेमाजी भोकरे यांनी तक्रारदाराकडून वरील कामासाठी 70,000/- रुपये लाच स्वीकारली असता दोघांना रंगेहात पकडण्यात आले.
