किरण खुडे

राजगुरूनगर : (हवेलीनामा प्रतिनिधी) : बसस्थानक परिसरातील वाढती वाहतूक कोंडी, प्रवाशांना होणारा त्रास आणि अवैध प्रवासी वाहतुकीमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांना आळा घालण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने कठोर पावले उचलली आहेत. येथील राजगुरूनगर एसटी बसस्थानकाच्या २०० मीटर परिसरातील नो-पार्किंग झोनमध्ये उभ्या राहून अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. पोलिसांच्या मदतीने दोन दिवसांत सुमारे ५० वाहनांवर कारवाई करण्यात आली. अशी माहिती आगारव्यवस्थापक श्रीमती विद्या कदम यांनी दिली.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक तसेच राज्य परिवहन महामंडळाच्या मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी डॉ. प्रियांका नारनवरे यांच्या निर्देशानुसार राज्यभर अवैध प्रवासी वाहतुकीच्या विरोधात विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे.

बसस्थानकाच्या २०० मीटर परिसरात खासगी वाहने उभी करून प्रवाशांची अवैध वाहतूक केली जात असल्याच्या तक्रारी सातत्याने प्राप्त होत होत्या. यामुळे बसस्थानक परिसरात वाहतूक कोंडी निर्माण होण्यासह एसटी बसच्या आवागमनालाही अडथळे येत होते. या पार्श्वभूमीवर विभागीय सुरक्षा दक्षता पथकांनी विविध बसस्थानकांवर अचानक भेटी देत स्थानिक पोलिसांच्या सहकार्याने संयुक्त कारवाई सुरू केली आहे.

नो-पार्किंग झोनमध्ये उभ्या असलेल्या वाहनांची तपासणी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. या मोहिमेमुळे बसस्थानक परिसरातील वाहतुकीत शिस्त निर्माण होण्यास मदत होत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. विशेष म्हणजे, अवघ्या दोन दिवसांतच सुमारे ५० वाहनांवर कारवाई करण्यात आली असून पुढील आठवडाभर ही मोहीम अधिक तीव्रतेने राबविण्यात येणार आहे.

अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांवर तसेच नो-पार्किंग झोनचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा पुणे विभागाचे वरिष्ठ सुरक्षा व दक्षता अधिकारी विजय धनगर, यादव सानप, आगारव्यवस्थापक श्रीमती विद्या कदम यांनी दिला.

या विशेष मोहीमेत राजगुरूनगर आगारातील स्थानकप्रमुख उत्तम लांडे, वाहतूक निरीक्षक प्रविण तुपसांगवे, सहाय्यक वाहतूक निरीक्षक एम. एफ. सय्यद, वरिष्ठ लिपीक राजेश दौंडकर, सुरक्षारक्षक संदेश उतळे, वाहतूक नियंत्रक मनिषा सुतार, पोलीस हवालदार जीजाबापू बिडकर हे सहभागी झाले होते.

दरम्यान, या मोहिमेविषयी बोलताना आगारव्यवस्थापक श्रीमती विद्या कदम यांनी सांगितले की, बसस्थानक परिसरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवणे, एसटी प्रवाशांची सुरक्षितता सुनिश्चत करणे आणि अवैध प्रवासी वाहतुकीला आळा घालणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे वाहनचालकांनी नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *