पुणे (हवेलीनामा) नवीन वीज मीटर जोडणी करण्यासाठी नुकतीच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा कारवाई करून हडपसर येथील अधिकाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल केला त्यानंतर पुन्हा महावितरण मधील एका वायरमनला नवीन वीज जोडणीसाठी दोन लाखाची लाच मागणी करून ती स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा कारवाईत रंगेहात पकडले
गजानन बाळासाहेब चट्टे, वय 35 वर्षे, महावितरण वायरमन, येलवाडी ता. खेड जि.पुणे असे लाच मागणी करणाऱ्या वायरमनचे नाव असून त्याच्या विरुद्ध देहू रोड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.
सविस्तर माहिती अशी की,तक्रारदार हे शासकीय इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असून त्यांनी संत तुकाराम नगर येलवाडी, ता. खेड येथील एक एक गंठ्याच्या अकरा प्लॉट पैकी एक गंठा प्लॉट घेतलेल्या एका महिलेने तिच्या प्लॉट मध्ये नवीन वीजमीटर बसवण्यासाठी तक्रारदार यांना कॉन्ट्रॅक्ट दिले होते. त्याप्रमाणे तक्रारदार यांनी त्या महिलेकडून वीज मीटरसाठी आवश्यक असणारे कागदपत्र घेऊन तिच्या नावाने महावितरणकडे ऑनलाइन मागणी अर्ज दाखल केला होता. अर्ज अपलोड झाल्यावर तक्रारदार हे महावितरणचे वायरमेन चट्टे यांना त्या जागेचा सर्वे करून देण्यासाठी भेटले, त्यांनी तक्रारदार यांच्याकडे त्या प्लॉटिंग मधील सर्वच्या सर्व 11 प्लॉटचे विज मीटर बसवण्याची कॉन्ट्रॅक्ट तुम्हाला देतो असे सांगून 11 नवीन वीज मीटर बसवण्यासाठी तक्रारदाराकडे रू. 2,00,000/- च्या लाचेची मागणी केल्याची तक्रार तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली.
दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिनांक 5/6/2026 रोजी लाच मागणी पडताळणी कारवाई केली असता त्या कारवाईदरम्यान वायरमन चट्टे यांनी तक्रारदाराकडे नवीन वीज मीटर मागितलेल्या प्लॉटमधील एकूण 11 प्लॉटच्या नवीन वीज मीटर जोडणीसाठी 2,00,000/- रूपयांच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. लाच मागणी झाल्यानंतर दिनांक 05/06/2026 रोजी केलेल्या सापळा कारवाईदरम्यान यातील लोकसेवक वायरमन श्री चट्टे यांनी तक्रारदाराकडून त्यांच्या वरील कामाकरीता 2,00,000/- रूपये लाचेची रक्कम 18.32 वाजता भैरवनाथ चौक देहूगाव, तालुका खेड, जि. पुणे या ठिकाणी स्वीकारली असता त्यांना ताब्यात घेण्यात आले.
गेल्या दोन दिवसात महावितरणच्या वेगवेगळ्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांवर लाच प्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने नेमके महावितरण मध्ये चालले तरी काय असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकाला पडला आहे यावरून सर्वसामान्य माणसांचे काम लाच दिल्या विना होणार की नाही असाच प्रश्न पडला आहे या घटनेनंतर तरी महावितरण मधील कर्मचारी सुधारणार का असा सवाल महावितरण चा ग्राहक विचारात आहे.
