अतुल देशपांडे,

सातारा (हवेलीनामा प्रतिनिधी) .आंबेनळी घाटात पुन्हा एकदा खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. महाबळेश्वर पोलादपूर रस्त्यावर बावली टोक ते दाभिल टोक दरम्यानच्या खोल दरीमध्ये एका वृद्ध महिलेचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर तातडीने सातारा आणि रायगड पोलिसांना कळविण्यात आले. त्यानंतर अलिबाग येथील एका युवकाने स्वतःच्या आजीचा खून करून मृतदेह दरीत फेकल्याची धक्कादायक माहिती पोलिस तपासातून समोर आली आहे.

याबाबत माहितीनुसार, सकाळच्या सुमारास पोलादपूर पोलिसांनी प्रतापगड मदत पथकाला (सर्च अँड रेस्क्यू टीम) संपर्क साधून आंबेनळी घाटातील खोल दरीत मृतदेह फेकण्यात आल्याची माहिती दिली.त्यानंतर तातडीने शोधमोहीम राबवण्यात आली. सुमारे दीड तासांच्या अथक प्रयत्नांनंतर जवळपास १०० फूट खोल दरीत काळ्या रंगाच्या पिशवीमध्ये मृतदेह आढळून आला. यानंतर रेस्क्यू टीमने दोरखंड व अन्य तांत्रिक साहित्याच्या सहाय्याने दरीत उतरून मृतदेह बाहेर काढण्याची मोहीम हाती घेतली. अत्यंत धोकादायक परिस्थितीत जवळपास तासभर प्रयत्न केल्यानंतर मृतदेह दरीबाहेर काढण्यात आला. या मोहिमेत सुनील बाबा भाटिया, अनिल केळगणे, जयवंत बिरामणे, जयदीप शिंदे, अनिकेत वागदरे, आशिष बिरामणे, ऋषीकेश जाधव, अजित जाधव, मुन्ना उतेकर, ओमकार सोनावणे, शरद सावंत, निखिल सावंत आणि संकेत सावंत यांनी सहभाग घेतला.

अलिबाग पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयित युवकाने चौकशीदरम्यान स्वतःच्या आजीचा खून केल्याची कबुली दिल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास अलिबाग पोलिस करत आहेत.महाबळेश्वर पोलादपूर रस्त्यावरील आंबेनळी घाटात घनदाट जंगल आहे. याचा फायदा घेऊन अनेकदा या परिसरात वेगवेगळ्या अपघाताच्या आणि मृतदेह फेकून देण्याच्या घटना घडत असतात. अवघड घाट वळणे असल्याने हा घाट प्रसिद्ध आहे. मागील आठवड्यात सातारा येथील युवकांच्या गाडीच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी मध्यरात्रीच्या सुमारास खोल दरीत कोसळून आठ जणांचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच खोल दरीत मृतदेह आढळून आल्याने पुन्हा या घाट रस्त्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे या परिसरात महाबळेश्वर आणि पोलादपूर पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *