थेऊर (हवेलीनामा) पुणे परिसरातील विषारी हातभट्टी दारू प्रकरणानंतर राज्यभरात संताप व्यक्त होत असून राज्य उत्पादन शुल्क विभागाबरोबरच पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. स्थानिक लोकप्रतिनिधीची नेमकी काय भूमिका आहे असा सवाल नागरिक विचारत आहेत. यामध्ये भोरचे आमदार शंकर मांडेकर अ‍ॅक्शन मोडवर आले आहेत.त्यांनी भोर, राजगड आणि मुळशी तालुक्यांतील हातभट्टी दारूसह इतर अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करण्यासाठी येत्या आठ दिवसांत सर्व अवैध धंदे बंद करण्याच्या स्पष्ट सूचना भोरचे पोलिस उपअधीक्षक राजेंद्रसिंह गौर, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पुणे विभागीय उपआयुक्त सागर धोमकर तसेच संबंधित पोलिस अधिकार्‍यांना दिल्या आहेत.

विषारी हातभट्टी दारू प्रकरणानंतर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत असताना मांडेकर यांनी आपल्या मतदारसंघातील अवैध धंद्यांचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे. या व्यवसायांमुळे अनेक कुटुंबांचे आर्थिक व कौटोम्बीक नुकसान होत असून तरुण पिढी व्यसनाधीनतेच्या विळख्यात अडकत आहे.

भोर शहरात अनेक वर्षांपासून मटका, बनावट दारू, गांजा, गावठी दारू आणि मोबाईलद्वारे ऑनलाइन मटका यांसारखे अवैध व्यवसाय सुरू असल्याचा आरोप करण्यात येत आहे. तसेच राजगड आणि मुळशी तालुक्यांमध्येही हातभट्टी दारूची निर्मिती आणि विक्री वाढल्याची तक्रार आहे. यावर ताबडतोब उपाययोजना केली नाही तर आगामी विधानसभेच्या अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित करून सरकारचे लक्ष वेधणार असल्याचाही इशारा त्यांनी दिला आहे. त्यांच्या भूमिकेचे नागरिकांकडून स्वागत होत असून, समाजाला घातक ठरणारे अवैध धंदे कायमस्वरूपी बंद व्हावेत, अशी मागणी नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *