किरण खुडे
राजगुरूनगर : (हवेलीनामा प्रतिनिधी ) : कान्हेवाडी बुद्रुक (ता. खेड) येथे ढगमाऊली डोंगराला लागलेल्या वणव्यात एका घराला आग लागल्याने आदिवासी बांधवाचे घर जळून खाक झाले होते. दोन महिन्यांपूर्वी झालेल्या या घटनेत घरमालक गंगाराम खंडे यांचे संपूर्ण घर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले होते.
वणव्यातील या आगीत सुदैवाने जीवीतहाणी झाली नाही. परंतु घरातील धान्य, कपडे, कागदपत्रांसह सर्वच जळून खाक झाले होते. कुटुंबांची आर्थिक स्थितीही जेमतेम आहे. कागदपत्रांची अडचण निर्माण झाल्याने शासकीय मदत मिळण्यातही समस्या येत आहेत. त्यांच्या या संकटातून सावरण्यासाठी व पुन्हा घर उभारणीसाठी गावातील ग्रामस्थ, तालुक्यातील विविध सेवाभावी संस्था व संघटना तसेच वैयक्तिक पातळीवर मदत जमा होत आहे. घर बांधकामाच्या कामालाही प्रारंभ झाला आहे. तरीही आणखी मदतीची गरज आहे. त्यावेळी या कुटुंबाचा संसार पुन्हा उभा राहीलं, यासाठी नागरीकांना मदतीचे आवाहन कान्हेवाडी बुद्रुकच्या सरपंच उर्मिला दत्ता रुके यांनी केले आहे.
मदतीसाठी तसेच इतर माहितीसाठी कान्हेवाडी बुद्रुक येथील सामाजीक कार्यकर्ते प्रा. मिलींद कोबल व दीप कोबल यांच्याशी (मोबा. ९९७५९९१५९८ ) संपर्क साधण्याचे आवाहन सरपंच रुके यांनी केले आहे.
