थेऊर (हवेलीनामा) समाज घडविण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारी व्यक्ती अर्थात शालेय शिक्षक होय भारतीय शिक्षण व्यवस्थेमध्ये गुरु शिष्य परंपरेला अनन्यसाधारण महत्त्व आहे परंतु अलीकडच्या आधुनिक काळामध्ये यात बदल होऊन या गुरूंची जागा अर्थात प्राथमिक शालेय शिक्षकांकडे येऊन पोहोचली, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाची मुहूर्तमेढ बाल्यावस्थेतच रोवली जात असते त्यामुळे प्राथमिक शिक्षक ही महत्त्वाची भूमिका पार पडतात. जिल्हा परिषद शिक्षण विभाग अंतर्गत असलेल्या केंद्र प्रमुख आशालता कटके या नुकत्याच सेवानिवृत्त झाल्या त्यांनी आपल्या संपूर्ण शैक्षणिक सेवा कालावधीत अनेक मैलाचे दगड पार करून आपल्या कामाचा ठसा उमटवला.
पुरंदर तालुक्यातील वाघापूर मूळ गाव असले तरीही वडील सैन्य दलात असल्यामुळे त्यांचा जन्म पंजाब राज्यातील फैजपूर येथे झाला. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण गावातच पूर्ण झाल्यानंतर प्राथमिक शिक्षक पदविका अभ्यासक्रमासाठी सेवा सदन पुणे येथे प्रवेश घेतला. यासाठी त्यांच्या शालेय शिक्षकांबरोबर आई वडिलांचे मिळाले.
शिक्षणाविषयी अनास्था असणाऱ्या काळात त्यांनी डीएड पूर्ण झाल्यानंतर मुळशी तालुक्यातील खांबोली केंद्रात जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा जवळ येथे दिनांक १० नोव्हेंबर १९८७ रोजी नियुक्ती मिळाली. विकासाच्या गंगेचा उगम शिक्षणातून आहे हे राजर्षी शाहू, फुले आंबेडकरांचे विचार या ठिकाणी रुजवण्यास सुरुवात केली. त्यानंतर दौंड तालुक्यातील जावजीबुवाचीवाडी या गावी ज्ञानार्जनाचे काम केले. या ठिकाणी कार्यरत असताना तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन करीर यांच्या मार्गदर्शनाखाली दौंड तालुक्यातील आदर्श शाळा घडविली. या शाळेला अनेक शाळांनी त्याकाळी आवर्जून भेट दिली. याच काळात त्यांचा गोकुळ नामदेव कटके यांच्यासोबत विवाह झाला. सांसारिक जीवनात तीन मुलांचे संगोपन करत असताना सामाजिक जीवनामध्ये आपल्या कार्याचा आलेख उंचावत ठेवला.
शैक्षणिक ज्ञानार्जनांचे काम करत असताना मुळशी हवेली या तालुक्यामध्ये विद्यार्थी घडवत असताना अनेक अडीअडचणींना तोंड द्यावे लागले.अभिनव कल्पना वापरत ३६ वर्ष उपशिक्षक व पदवीधरपदी अविरत सेवा करून ०६ मार्च २०२४ रोजी पदोन्नती मिळून हवेली तालुक्यातील थेऊर केंद्रात केंद्रप्रमुख पदी नियुक्ती झाली. या काळात थेऊर, शेवाळवाडी, लोणी काळभोर, केसनंद, सोरतापवाडी या केंद्रात केंद्रप्रमुख पदी कार्यरत असताना पुणे जिल्हा परिषदेचा पुणे जिल्ह्याचा सर्वात मानाचा ‘अध्यक्षचषक’ शेवाळवाडी शाळेस प्राप्त झाला. थेऊर केंद्रातील तारमळा शाळेच्या विद्यार्थ्यांना इस्त्रो या भारतातील अवकाश क्षेत्रात कार्यरत नामांकीत संस्थेस भेट देण्यासाठी झालेल्यापरीक्षेत घवघवीत यश मिळाले.
कटके मॅडम यांच्या कार्यकाळात केंद्रातील शाळांचा भौतिक दर्जा सुधारतानाच, गणित ओलंपियाड सारख्या खाजगी शाळात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्तरावर होणान्या परीक्षा केंद्रात सुरू केल्या. सामाजिक सेवांचा वसा मुलांपर्यंत पोहोचवण्याचे काम केलं. वर्षभर शाळा भरवणाऱ्यांच्या पाठीवर थाप दिली. विद्यार्थ्यामधील कला गुण ओळखून शास्त्रीय गायन, योग साधना, सामाजिक सेवा यासारखे छंद जोपासण्यासाठी लहानग्यांना बळ दिले. कटके मॅडम मधील उत्साह व हसतमुख चेहरा अनेकांना सातत्याने कार्यतत्पर राहण्याचा संदेश देत राहील. आणि भविष्यातील पिढी घडविण्यात प्रत्येक जण आपला वाटा उचल यासाठी आपले कार्य नेहमीच मार्गदर्शन करणार अशीच भावना उपस्थित शिक्षक बांधवांनी व्यक्त केली.
” केंद्रप्रमुख सौ. आशालता गोकुळ कटके मॅडम यांच्या सेवापूर्तीचा हा क्षण म्हणजे एका समर्पित, कर्तव्यनिष्ठ आणि प्रेरणादायी शैक्षणिक प्रवासाला दिलेला पूर्णविराम आहे. पूर्णविरामानंतर नवीन वाक्य सुरू होतं त्याप्रमाणे नवीन प्रवास नव्याने सुरू होणार आहे.
मॅडम म्हणजे प्रगल्भ अनुभव, दूरदृष्टी, कार्यतत्परता आणि स्नेहशील मार्गदर्शन यांचे सुंदर प्रतीक. आपल्या प्रदीर्घ सेवाकाळात त्यांनी ज्ञानाची ज्योत तेवत ठेवत असंख्य शिक्षकांना प्रेरणेची दिशा दिली. त्यांच्या विचारांतील स्पष्टता, निर्णयांतील परिपक्वता आणि कार्यातील सातत्य यामुळे त्यांनी प्रत्येकाच्या मनात आदराचे स्थान निर्माण केले.त्यांचे मार्गदर्शन हे केवळ प्रशासकीय चौकटीत मर्यादित न राहता, शिक्षकांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला आणि शैक्षणिक गुणवत्तेला नवे आयाम देणारे ठरले. त्यांच्या सहवासात काम करणाऱ्या प्रत्येकाला विश्वास, प्रोत्साहन आणि सकारात्मकतेची अनमोल शिदोरी लाभली.आज सेवापूर्तीच्या उंबरठ्यावर उभे राहून त्यांच्या कार्याचा गौरव करताना एकच भावना मनात दाटून येते—सेवा संपते, पण सेवाभावातून निर्माण झालेला आदर्श कधीच संपत नाही.त्यांच्या आयुष्याचा पुढील प्रवास आरोग्य, आनंद, समाधान आणि नव्या स्वप्नांच्या पूर्ततेने उजळून निघो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.“ज्ञानदीप प्रज्वलित ठेवत अनेकांना दिशा देणाऱ्या या कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वास सेवापूर्तीच्या हार्दिक शुभेच्छा!”
(सरिता परदेशी, शिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, तारमाळा, थेऊर )
