​चाकण: ( हवेलीनामा प्रतिनिधी) चाकण बाजार समितीच्या महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून आयोजित करण्यात आलेल्या बैठकी दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि रयत क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र वाद झाल्याची घटना समोर आली आहे. या आंदोलनासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रीतसर पोलीस परवानगी घेतली होती, मात्र आंदोलनाच्या ठिकाणी इतर संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती लावत वैयक्तिक टीका टिप्पणी सुरू केल्याने हा वाद उफाळल्याचे समजते.

​स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आंदोलनाची अधिकृत परवानगी त्यांचीच होती. तरीही रयत क्रांती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तेथे येऊन शेतकऱ्यांच्या मूळ प्रश्नांवर बोलण्याऐवजी वैयक्तिक पातळीवर टोमणे मारण्यास आणि ‘टिमकी’ वाजवण्यास सुरुवात केली. “आम्ही आमचे आयुष्य या संघटनेसाठी आणि शेतकऱ्यांसाठी घालवले आहे. विरोधक असताना आंदोलने करायची आणि सत्तेच्या जवळ असताना वेगळी भूमिका घ्यायची, ही दुटप्पी भूमिका खपवून घेतली जाणार नाही,” असा संताप स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.​या वादात सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेवर आणि त्यांच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांवर जोरदार टीका करण्यात आली. भाजपशी असलेल्या जवळीकतेवरून आणि आमदार सदाभाऊ खोत यांच्या भूमिकेवर स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला. तसेच, रयत क्रांती संघटनेचे स्थानिक तालुकाध्यक्ष हे केवळ राजकीय लाभासाठी आणि प्रसिद्धीसाठी फिरत असून, आंदोलनाचा वापर स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी करत असल्याचा आरोपही करण्यात आला.

​शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे केवळ राजकारण:

“आम्ही पदरमोड करून शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरतो. कांद्याच्या आणि हमीभावाच्या मुद्द्यावर प्रामाणिकपणे भूमिका मांडण्याऐवजी काही लोक येथे केवळ चमकोगिरी करायला येतात,” असा टोला स्वाभिमानीच्या नेत्यांनी लगावला. तसेच, १९४७ पासून २०२६ पर्यंत देशात शेतकऱ्यांची हीच परिस्थिती राहण्यास काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सरकारही तितकेच जबाबदार होते, अशीही खंत यावेळी व्यक्त करण्यात आली. स्वामीनाथन आयोग आणि हमीभावाचा कायदा पूर्वीच झाला असता, तर आज शेतकऱ्यांवर ही वेळ आली नसती, असेही आंदोलकांचे म्हणणे होते.​या सर्व प्रकारामुळे चाकणमधील शेतकरी आंदोलन पूर्व बैठकीला राजकीय वादाचे गालबोट लागले असून, दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *