अतुल देशपांडे,

सातारा (हवेलीनामा प्रतिनिधी) पाटण तालुक्यातील मंद्रुळ हवेली येथे रविवारी पार पडलेल्या विवाह सोहळ्यानंतर मोठ्या प्रमाणावर विषबाधेची घटना घडली. लग्नातील जेवणानंतर अनेकांना उलट्या, जुलाब आणि पोटदुखीचा त्रास सुरू झाल्याने एकच खळबळ उडाली. प्राथमिक माहितीनुसार, या घटनेत सुमारे ७० जणांना विषबाधा झाली असून सर्वांवर मल्हारपेठ प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत.

विवाह सोहळ्यात सहभागी झालेल्या नागरिकांनी जेवण केल्यानंतर सायंकाळपासून एकामागोमाग एक जणांना उलट्या, जुलाब आणि तीव्र पोटदुखीचा त्रास जाणवू लागला. रुग्णांची संख्या झपाट्याने वाढल्याने नातेवाईकांनी त्यांना तातडीने मल्हारपेठ प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. काहींना उपचारासाठी सलाईन लावण्यात आले असून गंभीर रुग्णांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे.

प्राथमिक माहितीनुसार, विवाह सोहळ्यात सुमारे ८०० ते १००० नागरिकांनी भोजन केले होते. त्यामुळे आणखी काही जणांमध्ये विषबाधेची लक्षणे दिसून येण्याची शक्यता आरोग्य विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे.

 

आरोग्य केंद्रात बेड अपुरे; आपत्कालीन उपचार सुरू

 

एकाच वेळी मोठ्या संख्येने रुग्ण दाखल झाल्याने मल्हारपेठ प्राथमिक आरोग्य केंद्रात मोठी धावपळ उडाली. उपलब्ध बेड अपुरे पडल्याने काही रुग्णांवर जमिनीवर सलाईन लावून उपचार करण्याची वेळ आली. प्रकृती गंभीर झालेल्या रुग्णांना पुढील उपचारासाठी कराड येथील रुग्णालयात हलविण्याची तयारीही करण्यात आली.

विवाह सोहळा संपल्यानंतर परतीच्या प्रवासाला निघालेल्या वऱ्हाडातील काही सदस्यांनाही उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे विषबाधेचे कारण नेमके लग्नातील अन्न होते की पिण्याचे पाणी, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नसून तपासानंतरच वास्तविक कारण समोर येणार आहे.

 

अन्न व औषध प्रशासनाकडून नमुने ताब्यात

 

घटनेची माहिती मिळताच मल्हारपेठ पोलीस, आरोग्य विभाग आणि अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. लग्नातील भोजनासाठी तयार करण्यात आलेल्या विविध खाद्यपदार्थांचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आले असून प्रयोगशाळेच्या अहवालानंतर विषबाधेचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

या घटनेमुळे मंद्रुळ हवेली आणि मल्हारपेठ परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोग्य विभागाने विषबाधेच्या कारणांचा सखोल तपास सुरू केला असून आणखी रुग्ण आढळल्यास तातडीने उपचारासाठी आवश्यक यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता प्रकृती अस्वस्थ वाटल्यास त्वरित वैद्यकीय उपचार घेण्याचे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *