थेऊर (हवेलीनामा) पूर्व हवेलीतील लोणी काळभोर अपर तहसिल कार्यालयात कर्तव्यावर असलेल्या ग्राम महसुल अधिकाऱ्यावर लाच मागणी प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करत त्यांचे विरुद्ध लोणी काळभोर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने प्रसिद्ध दिलेला पत्रकानुसार अक्षय शिवाजी कोल्हे वय 28 वर्षे पद- ग्राम महसूल अधिकारी नेमणूक अप्पर तहसील कार्यालय लोणी काळभोर यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पडताळणी दरम्यान लाच मागणी
सविस्तर माहिती अशी की,यातील तक्रारदार यांचा जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय असून त्यांनी हिंगणगाव ता. हवेली येथील शेतजमीन सपाटीकरण, विहीर खोदकाम व पाईपलाईनची परवानगी मिळावी याकरीता अप्पर तहसीलदार लोणी काळभोर यांच्याकडे अर्ज केला होता. लोकसेवक अक्षय कोल्हे हे अपर तहसीलदार कार्यालयामध्ये ग्राम महसूल अधिकारी म्हणून काम करत आहेत. तक्रारदाराने मागितलेल्या परवानगी संदर्भाने ते तक्रारदाराकडे रू. 2,00,000/- रुपये लाचेची मागणी करत असल्याबाबतची तक्रार तक्रारदार यांनी दिनांक 01/05/2026 रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग पुणे येथे तक्रार दिली.
तक्रारीच्या अनुषंगाने दि. 02/05/2026 रोजी लाच मागणी पडताळणी कारवाई केली असता यातील लोकसेवक कोल्हे यांनी पडताळणी कारवाई दरम्यान तक्रारदाराकडे त्याने मागितलेल्या परवानगी अर्जावर अपर तहसीलदार लोणी काळभोर यांच्याकडून कार्यवाही करून देतो या कारणासाठी तडजोडीअंती रू. 1,00,000 (एक लाख रुपये) लाच मागितल्याचे निष्पन्न झाले आहे.
लोकसेवक अक्षय कोल्हे यांचेविरुद्ध लोणीकाळभोर पोलीस स्टेशन येथे आज गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
