थेऊर (हवेलीनामा) पूर्व हवेलीतील बहुतेक सर्वच गावांमध्ये अलीकडच्या काळात बुलेट सायलेन्सर मध्ये छेडछाड करून गावांमध्ये धुमाकूळ घालण्याचा नवीनच पायंडा पडला आहे त्यामुळे परिसरातील शांतता व सुव्यवस्था धोक्यात आल्याचे दिसून आल्याने पुणे ग्रामीण पोलीस दलांतर्गत असलेल्या उरुळी कांचन पोलीस स्टेशन ने उरळीकांचन परिसरातील अशा नागरिकांना त्रासदायक ठरणाऱ्या बुलेट राजांवर कार्यवाही करत तब्बल 22 वाहनांवर दंडात्मक कारवाई करत 22 हजार रुपये दंड वसूल केला तसेच या बुलेट चे सायलेन्सर काढून त्यावर जेसीबी फिरवला त्यामुळे परिसरामध्ये काही प्रमाणात शांतता प्रस्थापित झाली.
उरळी कांचन चे पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसांमध्ये परिसरात बुलेटचे सायलेन्सर बदलून रस्त्यावर जोरजोरात फटाका आवाज काढत वाहने पळवणाऱ्यांची संख्या लक्षणीय वाढल्याने नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला होता त्यामुळे उरुळी कांचन मधील पोलीस कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने अशा त्रासदायक बुलेट्स वाहनांवर कारवाई करण्यात आली या बुलेटचे सायलेन्सर काढून त्यावर जेसीबी फिरवून ते सायलेन्सर नष्ट करण्यात आले तसेच या वाहनां धारकांकडून 22 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.
या कारवाईत सहाय्यक फौजदार रमेश भोसले,पोलीस हवालदार कमलेश होले, संतोष जाधव, उद्धव गायकवाड,प्रशांत पवार पोलीस शिपाई अश्वजीत मोहोळ, अमोल खांडेकर, शरद चव्हाण, प्रदीप बालगुडे, सुमित वाघ या पोलीस कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला..
अशा वाहनांवर भविष्यात नेहमीच कारवाई करण्यात येईल तसेच अल्पवयीन वाहनचालकांनी च्या पालकांनी आपल्या पाल्यांना वाहन चालविण्यास दिल्यास त्यांच्यावर देखील दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांनी सांगितले.
