थेऊर (हवेलीनामा) थेऊर नायगाव रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून थेऊर गावात प्राथमिक शाळेच्या पाठीमागील विद्युत मंडळाच्या कार्यालयासमोर या रस्त्यावर मोठा खड्डा पडला आहे त्यामुळे या रस्त्यावरून वाहतूक करणे अत्यंत जिकिरेचे झाले असून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून याची दखल घेऊन रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
थेऊर गावातून नायगाव कडे जाणारा रस्त्यावर जागोजागी खड्ड्यामुळे वाहन चालकांना मार्ग काढणे अवघड होत आहे सार्वजनिक बांधकाम खात्याकडून या रस्त्याची देखभाल दुरुस्ती पावसाळ्यापूर्वी करणे अपेक्षित असताना याकडे या विभागाचे अधिकारी पाहणीसाठी देखील फिरकले नाहीत असे चित्र सध्या अनुभवास येत आहे.

याच मार्गावर नायगाव पासून पुढे श्रीक्षेत्र प्रयागधाम आणि पुढे टिळेकर वाडी पर्यंत हा रस्ता मंजूर आहे त्यामुळे या रस्त्यावर अनेक वेळा निधी पडून देखील रस्त्याचे काम होत नाही छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये थोडेफार काम करून उर्वरित रस्ता आहे त्या स्थितीत सोडला जातो विशेष म्हणजे मागील पावसाळ्यामध्ये आलेल्या महापुरात थेऊर येथील रुका वस्ती या ठिकाणी असलेल्या ओढ्यावर पाणी तुंबून अनेकांच्या घरात पाणी शिरले त्यावेळी आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली एवढी भयंकर परिस्थिती उद्भवल्या नंतर देखील आजतागायत त्या ओढ्यावर कुठल्याही प्रकारचे काम करण्यात आलेले नाही त्या ठिकाणी मोठे साकव तयार करण्यात यावे अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली होती त्यावर सार्वजनिक बांधकाम खात्याकडून केवळ आश्वासना पलीकडे काहीही करण्यात आले नाही रस्त्याच्या बाजूला मोठमोठे खड्डे आजही त्या महापुराची आठवण करून देतात त्यामुळे संबंधित खात्याकडून लवकरात लवकर काम हाती घेण्यात यावे अशी तेथील रहिवाशांनी मागणी केली आहे.
