थेऊर (हवेलीनामा) थेऊरफाटा लोणीकंद अष्टविनायक सुविधा मार्गांवरील थेऊरफाटा शेजारी असलेल्या रेल्वे उडाणपुलाला तब्बल 5 ते 10 फुटांचे खोल भगदाड पडले असून काही ठिकाणी भिंतींना तडेही गेल्याचे दिसून येत आहे, हवेली पंचायत समितीचे सभापती युवराज काकडे यांनी तात्काळ या पुलाची पाहणी करून, भगदाडाच्या ठिकाणी नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून बॅरीगेट लावले आहे.

उडान पुलाच्या पाहणी दरम्यान सभापती काकडे यांच्या पाहणीत असे आढळून आले की या फुलाच्या भिंतींना देखील तडे गेले असून अनेक ठिकाणी झाडे उगवलेली आहेत त्यामुळे या पुलाला धोका उत्पन्न होणार आहे त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग, विशेष रस्ते प्रकल्प, पुणे यांच्याकडे, उड्डाणपुलाचे लवकरात लवकर स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी केली आहे. या मार्गावरून हजारो वाहनांची ये-जा होत असल्यामुळे कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी प्रशासनाने तात्काळ उपाययोजना कराव्यात, अशा सुचना संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून केल्या आहेत.

थेऊरला येणाऱ्या भाविकभक्तांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे. तसेच पुणे- सोलापूर महामार्ग व पुणे- नगर महामार्ग याना जोडणारा हा प्रमुख रस्ता असल्याने, या उड्डाणपुलावरून खूप मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक होते. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे दुर्लक्ष न करता तात्काळ दुरुस्ती करावी. या पुलाखाली रेल्वेची उच्च भाराची विद्युत वाहिनी असल्याने, भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
