किरण खुडे,
राजगुरूनगर : (हवेलीनामा प्रतिनिधी): येथील मंगेश आनंद धोत्रे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारीपदी निवड झाली. घरकामे करणारी आई आणि खासगी रुग्णालयात स्वागत कक्षात काम करणाऱ्या वडिलांच्या कष्टाचे चीज झाल्याची भावना निवडीनंतर धोत्रे यांनी व्यक्त केली.
धोत्रे यांचे मूळ गाव जुन्नर तालुक्यातील पिंपळगाव जोगा हे आहे. गावाकडील कोरडवाहू शेतीच्या तुटपुंज्या उत्पन्नामुळे आईवडील उपजीविकेसाठी राजगुरुनगर येथे २००५ मध्ये स्थायिक झाले. त्यानंतर मंगेश यांनी आपले प्राथमिक शिक्षण राजगुरुनगरच्या जिल्हा परिषद शाळेत घेतले. शालेय व महाविद्यालयीन शिक्षणही राजगुरुनगरलाच झाले. येथील सरसेनापती हंबीरराव मोहिते विधी महाविद्यालयातून वकिलीची परीक्षा दिल्यानंतर वकिलीची सनद घेतली. आणि पहिल्याच प्रयत्नात त्यांनी न्यायाधीश पदाच्या परिक्षेत यश प्राप्त केले.
न्यायाधीश पदाच्या परीक्षेसाठी कोणतीही शिकवणी न लावता केवळ स्वयंअध्ययनातून त्यांनी हे यश संपादन केले. विधी महाविद्यालयाच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी परिक्षेचा अभ्यास केला. वकिलीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर खेड येथील न्यायलयात जेष्ठ वकीलांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी वकिलीला सुरुवात केली.
जेष्ठांच्या मार्गदर्शनाखाली केवळ वकिलीचे पुस्तकी ज्ञानच नव्हे तर फौजदारी, दिवाणी, कौटुंबिक, महसुली अशा सर्व शाखांचे प्रत्यक्ष ज्ञान त्यांनी घेतले. त्याचा फायदा त्यांना न्यायाधीश पदाच्या मुलाखतीसाठी झाला.
धोत्रे यांची न्यायाधीशपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे वडील आनंद धोत्रे यांचे बालमित्र व राजगुरूनगर एसटी आगाराचे सेवानिवृत्त आगारव्यवस्थापक रमेश हांडे यांनी पिंपळगाव जोगा ग्रामस्थांच्या वतीने मंगेश धोत्रे यांच्यासह त्यांच्या आईवडीलांचाही सत्कार केला.
यावेळी बोलताना धोत्रे म्हणाले, अथक परिश्रमातून सारं काही शक्य आहे. त्यासाठी कोणताही शॉर्टकट नसतो. हे संस्कार मला माझ्या पिंपळगाव जोगा गावात आणि आईवडीलांकडून मिळाले आहेत, म्हणूनच मी यशस्वी झालो. याप्रसंगी रमेश हांडे यांनी भाषणातून धोत्रे यांचे कौतूक केले.
