अतुल देशपांडे,
सातारा (हवेलीनामा प्रतिनिधी) मुलगी नकोशी अशी समाजाची मानसिकता पाहण्यात येते परंतु मुलगा विशाल; पण आई-वडिलांना नकोसा झाला आहे की काय ? असा सवाल निर्माण झाला आहे. अवघ्या तीन महिन्यांचा तो कोवळा जीव जणू, बोलता येत नसतानाही ‘आई बाबा नका असे टाकू, मलाही न्या आपल्या घरी’ अशी आर्त हाकच जणू तो मारत असल्याचे दिसत आहे.सर्वसामान्यांचे हृदय पिळवटून टाकणारी ही घटना गेल्या तीन महिन्यापूर्वी घडली त्यानंतर आजपर्यंत त्या बाळाला घेण्यासाठी त्याचे आई वडील आलेच नाहीत.
याबाबत माहिती अशी, की ता. १५ ऑक्टोबर २०२५ रोजी मध्यरात्री पावणेतीनच्या सुमारास फलटण ते ठाकुरकी जाणाऱ्या मार्गावरील आडकेवस्ती येथील जयमल्हार हॉटेलच्या बाजूस असलेल्या साइडपट्टीवरच्या खड्यात नुकत्याच जन्माला आलेल्या पुरुष जातीच्या अर्भकास त्याच्या संबंधित आई-वडिलांनी त्याग करण्याच्या हेतूने टाकून दिले होते. याबाबत मनोजकुमार अशोक आडके यांनी डायल ११२ वरती कॉल करून पोलिसांना माहिती दिल्याने घटनास्थळी फलटण पोलिस ठाण्याच्या महिला उपनिरीक्षक गाजरे त्यांच्या स्टाफसह पोहोचल्या. त्यांनी लहान अर्भकास फलटण येथील सरकारी दवाखान्यात दाखल करून अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.या घटनेस आता तीन महिने उलटून गेले तरी कोणी नातेवाईक चौकशी करण्यासाठी अथवा घेऊन जाण्यासाठी आले नाही. त्यामुळे हे बालक बाल कल्याण समिती (सातारा) यांच्या आदेशाने खिंडवाडी (सातारा) येथील द्रोणागिरी शिक्षण संस्था संचलित शिशुगृहात काळजी वा संरक्षणासाठी दाखल करण्यात आले आहे. सध्या या बालकाला विशाल नावे संबोधले जात असून, आई वडील आणि नातेवाइकांसाठी याबाबत आवाहनही करण्यात आले आहे.
संबंधित बालक ‘विशाल’ यास घरी घेऊन जाण्यासाठी बालकल्याण समिती, जिल्हा महिला विकास अधिकारी आणि द्रोणागिरी शिक्षण संस्था संचलित शिशुगृह, खिंडवाडी (सातारा) येथे संपर्क करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. अन्यथा बालकाचे शासकीय नियमानुसार पुनर्वसन करण्यात येणार आहे.
