किरण खुडे,
राजगुरूनगर (हवेलीनामा प्रतिनिधी) : ध्येयनिश्चिती, आत्मविश्वास, उत्तम नियोजन व कृतिशीलता ही चतु:सूत्री यश प्राप्तीची गुरुकिल्ली असल्याचे प्रतिपादन दीपस्तंभ फाउंडेशनचे प्रमुख यजुर्वेद्र महाजन यांनी केले. ते खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात आयोजित साहेबरावजी बुट्टेपाटील स्मृती व्याख्यानमालेत यशस्वी व चांगला माणूस घडण्यासाठी या विषयावर बोलत होते.
या प्रसंगी संस्थाध्यक्ष ॲड. देवेंद्र बुट्टेपाटील, संचालक बाळासाहेब सांडभोर, हिरामण सातकर, राजेंद्र टाकळकर, व्याख्यानमाला समिती अध्यक्ष ॲड. राजमाला बुट्टेपाटील, प्राचार्य डॉ. एस.एस.पिंगळे, डॉ.एस.एस.जगताप, उपप्राचार्य प्रा. व्ही.बी.दौंडकर, प्रबंधक एन.एम.शिंदे उपस्थित होते.
यजुवेंद्र महाजन पुढे म्हणाले की, माणूस म्हणून आपल्यामध्ये कोणतीही शारीरिक कमतरता असली तरी वाईट न वाटता त्यावर मात करण्याचा प्रयत्न करा. आपल्याकडे प्रोत्साहन देण्यापेक्षा चिडवणारी संस्कृती अधिक आहे. त्यामुळे पुढे येण्यास विद्यार्थी घाबरतात. ते पुढे म्हणाले की काहीही झालं तरी ‘चालंतय’ अशा विचारधारेमुळे समाजजीवनाचा ऱ्हास झाला आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी आपले जीवन स्वतः: घडवले पाहिजे. शिक्षण घेताना सर्वोत्तमाचा ध्यास घ्यायला हवा. माणसाचे जीवन अमूल्य असून सभोवतालच्या समाजजीवनाला प्रतिसाद द्या. प्रगतीच्या दिशेने नेतील असे मित्र निवडा. आपल्या कामाच्या ठिकाणी कार्यसंस्कृती विकसित करा. समर्पण भावनेने काम करा. व्याख्याने पुस्तके आणि चांगल्या माणसांच्या सहवासात राहा. जीवनात चांगला माणूस होण्याचे उद्दिष्ट ठेवा. त्यासाठी माणुसकी, प्रामाणिकपणा, सेवाभाव कर्तव्यदक्षता ही मूल्ये अंगी रूजवावीत असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. धनंजय बो-हाडे, परिचय प्रा.शिल्पा टाकळकर, आभार विद्यार्थीनी तनिष्का शेलार हिने मानले.
