किरण खुडे
राजगुरूनगर (हवेलीनामा प्रतिनिधी) : दूरचित्रवाणीवरील सारेगमप लिटील चॅम्प्स पर्वामध्ये सहभागी होऊन विजेता होण्याचा बहुमान मिळाला. जगभरातील प्रेक्षकांचे प्रेम मिळाले. लतादीदींसह अनेक दिग्गज मान्यवरांचे आशीर्वाद मिळाले. त्या पर्वातील प्रत्येक सोनेरी क्षण माझ्यासाठी अविस्मरणीय अनुभव असून यामुळे मला नवी ओळख मिळाल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध गायिका कार्तिकी गायकवाड यांनी केले. त्या खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात आयोजित साहेबरावजी बुट्टेपाटील स्मृती व्याख्यानमालेत एक सुरेल मैफिल या विषयावर बोलत होत्या.
या प्रसंगी संस्थाध्यक्ष ॲड. देवेंद्र बुट्टेपाटील, उपाध्यक्ष नानासाहेब टाकळकर, संचालक बाळासाहेब सांडभोर, हिरामण सातकर, सतीश नाईकरे, व्याख्यानमाला समिती अध्यक्ष ॲड. राजमाला बुट्टेपाटील, प्राचार्य डॉ. एस.एस.पिंगळे, डॉ.एस.एस.जगताप, उपप्राचार्य प्रा. व्ही.बी.दौंडकर, प्रबंधक एन.एम.शिंदे उपस्थित होते.
कार्तिकी गायकवाड पुढे म्हणाल्या की आमच्या कुटुंबात संगीताचे वातावरण असून वडील पं. कल्याणजी गायकवाड यांनी माझ्यावर संगीताचे संस्कार केल्यामुळे आज मी इथपर्यंत पोहोचू शकले. संगीत कलेचा वारसा जपत मी संगीत क्षेत्रात नवनवीन गाणी करून रसिकांपर्यंत पोचवणार आहे. या मुलाखतीत त्यांनी आळंदी ते महाराष्ट्रातील प्रसिद्ध गायिका हा प्रवास उलगडून सांगितला. या कार्यक्रमात त्यांनी अभंग, गौळण, लावणी, गझल, चित्रपट गीते सादर केली. घागर घेऊन, रेशमाच्या रेघांनी, धुंदीत गंधीत होऊन सजना, हे सुरांनो चंद्र व्हा, जगी जीवनाचे सार, दिसते मला सुखचित्र नवे, लिंगोबाचा डोंगूर आभाळी गेला, सुख म्हणजे नक्की काय असतं, कांदा मुळा भाजी, अशी गीते सादर केली. या गाण्यांसह दम मस्त कलंदर या हिंदी गाण्यालाही विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कुटुंब, संगीत, लिटील चॅम्प्स पर्व, लग्न यावरील प्रश्नांना त्यांनी मोकळेपणाने उत्तरे दिली. विद्यार्थ्यांनी कोणताही न्यूनगंड न बाळगता आत्मविश्वासाने शिक्षण घेऊन करिअर करावे अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.
त्यांची मुलाखत प्रा. उमेश जगताप यांनी घेतली. परिचय प्रा. कोमल कर्वे यांनी सूत्रसंचालन व आभार प्रा. अमृता नाईकरे यांनी मानले.
