किरण खुडे
राजगुरूनगर (हवेलीनामा प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराजांनी कृषी क्रांती, सामाजिक क्रांती, अर्थ क्रांती, गनिमी काव्याची युद्ध क्रांती, आरमार क्रांती, गिरिदुर्ग आणि जलदुर्ग निर्मितीची क्रांती, भाषा-शुद्धी क्रांती आणि संस्कृतीच्या रक्षणाची सांस्कृतिक क्रांती करून हिंदवी स्वराज्य आणि सुराज्याची निर्मिती केल्याचे प्रतिपादन पांडुरंग बलकवडे यांनी केले. ते खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात आयोजित साहेबरावजी बुट्टेपाटील स्मृती व्याख्यानमालेत शिवरायांची अष्टक्रांती या विषयावर बोलत होते.
या प्रसंगी संस्थाध्यक्ष ॲड. देवेंद्र बुट्टेपाटील, संचालक बाळासाहेब सांडभोर, हिरामण सातकर, सुरेश टाकळकर, व्याख्यानमाला समिती अध्यक्ष ॲड. राजमाला बुट्टेपाटील, प्राचार्य डॉ. एस.एस.पिंगळे, डॉ.एस.एस.जगताप, उपप्राचार्य प्रा. व्ही.बी.दौंडकर, प्रबंधक एन.एम.शिंदे उपस्थित होते.
पांडुरंग बलकवडे पुढे म्हणाले की, परकीयांच्या आक्रमणापासून भारताच्या संस्कृती, समाज आणि राष्ट्राचे रक्षण करण्याचे महान कार्य छत्रपती शिवाजी महाराजांनी केले. ते भारतीय संस्कृतीचे जीर्णोद्धारक आहेत. शिवरायांनी निर्माण केलेल्या राष्ट्रवादातून प्रेरणा घेऊन तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे यांनी आपल्या प्राणांचे बलिदान देऊन राष्ट्राचेही रक्षण केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य निर्मितीच्या महामार्गाला आदर्श मानून हिंदुस्तान गौरवशाली करण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध व्हा, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. ज्योती वाळुंज, परिचय डॉ. कीर्ती नितनवरे, तर आभार विद्यार्थीनी अंजली बोंबले हिने मानले.
