किरण खुडे

राजगुरूनगर (हवेलीनामा प्रतिनिधी) : सद्य:स्थितीत आपल्या देशासमोर अनेक समस्या असून प्रत्येकाने धर्म,जात, पंथ, वर्ण, लिंग यावर कोणताही भेदभाव न करता देशसेवेसाठी जिथे संधी मिळेल तेथे आपल्या वाट्याचा देश घडवा, असे आवाहन शिवव्याख्याते राहूल गिरी यांनी येथे केले. ते खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात आयोजित साहेबरावजी बुट्टेपाटील स्मृती व्याख्यानमालेत कालचा वारसा, उद्याचा वारसदार – वर्तमान पिढीची जबाबदारी या विषयावर बोलत होते.

या प्रसंगी संस्थाध्यक्ष ॲड. देवेंद्र बुट्टेपाटील, उपाध्यक्ष नानासाहेब टाकळकर, संचालक बाळासाहेब सांडभोर, हिरामण सातकर, सतीश नाईकरे, व्याख्यानमाला समिती अध्यक्ष ॲड. राजमाला बुट्टेपाटील, प्राचार्य डॉ. एस.एस.पिंगळे, डॉ.एस.एस.जगताप, उपप्राचार्य प्रा. व्ही.बी.दौंडकर प्रबंधक एन.एम.शिंदे उपस्थित होते.

राहूल गिरी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, आई-वडिलांच्या संस्कारांचा आवाज तुमच्या कानात आणि मनात कायम ठेवा. भावना ही जगण्याची अभिव्यक्ती आहे. मोबाईलच्या अतिरेकामुळे माणूस भावनाशून्य होत चालला असून स्क्रीनचा वेळ कमी करा. फेसबुकवरील लाईक वाढवण्यापेक्षा समाजजीवनातील लायकी वाढवण्याकडे विद्यार्थ्यांनी लक्ष द्यावे. प्रजासत्ताकाचे सुख भोगणाऱ्या आपल्या देशाच्या पाठिशी क्रांतिकारक, राष्ट्रपुरुष व समाजसुधारकांच्या त्यागाचा, हौतात्म्याचा वारसा असून विद्यार्थ्यांनी तो समजून घेऊन उद्याच्या समर्थ भारताचा वारसदार व्हा असे आवाहन त्यांनी केले.

साहेबराव बुट्टेपाटील यांनी केलेल्या शैक्षणिक व सामाजिक कार्यामुळे ते जरी काळातून दूर गेले असले तरी समाजाच्या काळजातून गेले नाहीत. ते कायम विद्यार्थ्यांमध्ये राहतील असे गौरवोद्गार त्यांनी काढले.‌

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. कैलास सोनवणे, परिचय प्रा.वर्षा कांबळे, आभार विद्यार्थीनी साक्षी शिवेकर हिने मानले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *