किरण खुडे
राजगुरुनगर : (हवेलीनामा प्रतिनिधी) : चांडोली (ता.खेड) येथे श्री पांडुरंग आगमनानिमित्त प्रतिवर्षीप्रमाणे अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन केले आहे. अखंड हरिनाम सप्ताहाचे हे ४२ वे वर्ष असून त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती चांडोलीचे माजी सरपंच तथा सप्ताह समितीचे अध्यक्ष सोपानराव वाघमारे, सचिव नामदेव वाघमारे (गुरुजी) यांनी दिली. या सप्ताहाचा प्रारंभ शनिवार पासून (दि.२४ जानेवारी) होणार असून ३१ जानेवारी रोजी या सप्ताह कार्यक्रमाची सांगता होणार आहे.
कडूस (ता. खेड) येथे प्रतिवर्षी पंढरपूर येथून श्री.पांडुरंग विश्रांतीसाठी काही काळ येतात. त्यांच्या पंढरपूर ते कडूस प्रवासात श्रीपांडुरंगाचे विसाव्याचे ठिकाण म्हणजे खेड तालुक्यातील चांडोली येथे भीमानदी दक्षिणवाहिनी झालेल्या तीरावर असतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यानिमित्त गेल्या अनेक वर्षांपासून हा सप्ताह भीमा नदीकाठी चालत आलेला आहे. असे विश्वस्त दत्तात्रेय वाघमारे, दिगंबर सावंत व विठ्ठल सावंत यांनी सांगितले. सप्ताह काळात दररोज पहाटे काकड आरती, सकाळी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी नेमाचे भजन, सायंकाळी हरिपाठ, रात्री प्रसाद, त्यानंतर हरिकीर्तन व हरिजागर आणि अखंड वीनानाद असे कार्यक्रम होत आहेत. या कालावधीत ह.भ.प. पोपट महाराज राक्षे ( वेहळदरा ), संतोष महाराज बढेकर ( धामणी- आंबेगाव ), बिपिन महाराज कोरडे ( तुकईवाडी – खेड ), भरत महाराज थोरात ( वडगांव पाटोळे), योगिराज महाराज गोसावी ( पैठण ), ज्ञानेश्वर महाराज पठाडे (कर्जत), बाळशिराम महाराज मिंडे ( कोहींडे बुद्रुक), पांडुरंग महाराज घुले( देहू), यांची कीर्तने होणार आहे. तर माघ शुद्ध दशमीला बुधवारी( दि. २८) श्री. पांडुरंग आगमनानिमित्त भीमा नदीतीरावर विठ्ठल मंदिरासमोर सोपान महाराज सानप – शास्त्री ( हिंगोली) यांचे सकाळी कीर्तन होणार आहे.
या धार्मिक कार्यक्रमांसाठी परिसरातील भाविकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन विठ्ठल रखुमाई मंदिर ट्रस्ट, विठ्ठल रखुमाई ग्रामविकास मंडळ, विठ्ठल रखुमाई जिर्णोद्धार समिती, ब्रम्हेश्वर देवस्थान ट्रस्ट, भैरवनाथ मंदिर ट्रस्ट, विठ्ठल रखुमाई भजनी मंडळ, भैरवनाथ भजनी मंडळ, गुरुदत्त भजनी मंडळ, जय गणेश मंडळ, सम्राट गणेश मंडळ, तिरंगा गणेश मंडळ, ग्रामपंचायत चांडोली आणि समस्त ग्रामस्थ मंडळी यांच्या वतीने करण्यात आले आहे.
