अतुल देशपांडे,
सातारा (हवेलीनामा प्रतिनिधी) आसरे (ता. कोरेगाव) येथील सरपंच – व सदस्यावर हल्ला झालेला असताना त्यांच्यावरच खोटे गुन्हे दाखल करण्यात आल्याचा आरोप करत या घटनेच्या सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी करावी, अशी मागणी करत आसरेच्या काही ग्रामस्थांनी कोरेगाव पोलिस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन केले होते.
दरम्यान, आज सरपंच व सदस्यावर – हल्ला करणाऱ्यांवर कारवाई न झाल्यास आत्मदहनाचा इशारा आसरे येथील * ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलनादरम्यान दिला आहे. दुसरीकडे रूपेश सपकाळ यांच्याविरोधात टी. जे. सणस, अमोल सणस, ज्योती जरंडे, लता जरंडे, सुधीर सणस, नीलेश जाधव, अनिलसणस, विवेक जरंडे, तुकाराम सणस आदींनी पोलिस उपअधीक्षक राजश्री तेरणी यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे, की खोटे अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करून लोकांना नाहक त्रास देणे, दादागिरी करून नुकसान करणे, खंडणी, विकासकामांमध्ये अडथळे निर्माण करणे व गावाला वेठीस धरणाऱ्या रूपेश सपकाळ व त्यांच्या साथीदारांविरोधात तातडीने कारवाई न केल्यास पोलिस ठाण्यासमोर सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा या निवेदनाद्वारे दिला आहे.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते साहिल शिंदे यांनी मध्यस्थी करत आंदोलनकर्त्यांची बाजू मांडल्यानंतर पोलिस उपअधीक्षक राजश्री तेरणी यांनी
सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी करून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याने काल सायंकाळी आंदोलन थांबवण्यात आले.
याप्रकरणी आसरे येथील साहेबराव सणस, शिवाजी सणस, महादेव सणस, रवींद्र सणस, देवानंद शिंदे, शामराव सणस, शंकर महामुनी आदींसह ग्रामस्थांनी काल पोलिस ठाण्यात निवेदन दिले होते. त्यात म्हटले आहे, की गावातील गटाराच्या कामावरून सरपंच सविता सूर्यकांत सणस व रूपेश सीताराम सपकाळ यांच्यावर काहींनी जीवघेणा हल्ला केला. या संबंधितांवर गुन्हा दाखल झाला आहे.
मात्र, ते अद्याप मोकाट आहेत. याउलट रूपेश सपकाळ व सरपंच सविता सणस आणि त्यांच्या घरातील सदस्यांसह अन्य दोघांवर चोरीचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रूपेश सपकाळ व सरपंच सविता सणस यांच्यावर हल्ला झाला, त्याठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी करावी आणि या गुन्ह्यातील सहभागी असलेल्या संबंधितांना अटक करून कठोर कारवाईकरावी, या मागणीसाठी ठिय्या आंदोलन केले जाईल. त्यानुसार काल सकाळी या ग्रामस्थांनी पोलिस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केले.
दरम्यान, याठिकाणी साहिल शिंदे, राजाभाऊ जगदाळे, अरुण माने, प्रतिभा बर्गे, किशोर बर्गे, गणेश धनावडे, नामदेव गुरव आदींसह कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून आंदोलनास पाठिंबा दिला. या सर्वांनी कोरेगाव पोलिसांच्या कार्यपद्धतीवर तीव्र शब्दांत टीका केली. दरम्यान, सायंकाळी आंदोलकांच्या शिष्टमंडळासह साहिल शिंदे, अरुण माने, नामदेव गुरव आदींसह कार्यकर्त्यांनी पोलिस अधीक्षक राजश्री तेरणी यांच्या कार्यालयात त्यांची भेट घेतली.साहिल शिंदे यांनी आंदोलकांच्या वतीने बाजू मांडली. यावेळी झालेल्या चर्चेनंतर पोलिस उपअधीक्षक राजश्री तेरणी यांनी आंदोलनस्थळी येऊन सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी करून याप्रकरणी योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याने काल सायंकाळी आंदोलन थांबवण्यात आले होते.
