दिपक खिलारे,

इंदापूर :(हवेलीनामा प्रतिनिधी) महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या अभूतपूर्व यशानंतर राज्यामध्ये उलटफेर होण्यास सुरुवात झाली असून यातील पहिला परिणाम इंदापूर तालुक्यामध्ये झाल्याचे अनुभवास येत आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष प्रदीप गारडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकत हाती कमळ घेतले.

राज्यात होत असलेल्या पंचायत समिती, जिल्हा परिषद या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे माजी पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश केला. या प्रवेशाने तालुक्यासह, जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला धक्का बसला आहे.

शनिवार (दि.17) रोजी मुंबई येथील भाजप कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, इंदापूरचे भाजपा नेते प्रवीण माने, मयूर पाटील यांच्या उपस्थितीत गारटकर यांनी कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश केला.

प्रदीप गारटकर यांची सामाजिक आणि राजकीय कारकिर्दीची सुरुवात पतित पावन संघटनेच्या माध्यमातून झाली. यावेळी त्यांनी संघटनात्मक बांधणीला विशेष महत्त्व दिले. त्यांनी भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणूनही काम केले आहे. सन २००४च्या विधानसभा निवडणुकीत इंदापूरची जागा भाजपकडून शिवसेनेला सोडण्यात आल्यानंतर ते शिवसेनेचे उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरले होते. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. मात्र, त्यांनी तब्बल ७५ हजार मते मिळवून प्रभावी ताकद दाखवून दिली होती. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही त्यांचा प्रदीर्घ अनुभव असून, सन १९९२ ते सन १९९७ या कालावधीत त्यांनी इंदापूरचे

नगराध्यक्ष म्हणून काम केले आहे. तसेच, सलग दहा वर्षे नगरपालिकेवर स्वतःची सत्ता कायम ठेवण्यात त्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. सन २००५ ते २०२५ या कालखंडात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात विविध पदांवर काम करत अनेक निवडणुकांमध्ये पक्षाला यश मिळवून दिले. मात्र, पक्षातील नेतृत्वाशी झालेल्या वैचारिक मतभेदामुळे त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. त्यानंतर नुकत्याच पार पडलेल्या इंदापूर नगर परिषदेच्या निवडणुकीत त्यांनी हर्षवर्धन पाटील व प्रवीण माने यांना बरोबर घेत कृष्णा-भीमा विकास आघाडीच्या माध्यमातून नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवली होती. मात्र, अल्पशा मतांनी त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता.

 

 

उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंना धक्का !

 

 

इंदापूर मधिल राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांसह इंदापूर नगरपरिषदचे माजी नगराध्यक्ष विठ्ठल ननवरे, माजी उपनगराध्यक्ष राजेश शिंदे, विद्यमान नगरसेवक अतुल शेटे- पाटील, गणेश राऊत, सुधाकर ढगे, संजय शिंदे, वसीमभाई बागवान, हाजी नवाब बागवान, अनिल पवार, माजी नगरसेवक अविनाश मखरे, माजी नगरसेवक व माजी जिल्हाध्यक्ष अनिल राऊत, माजी नगरसेवक दादासाहेब सोनवणे, लाखेवाडी गावचे माजी सरपंच प्रभाकर खाडे, निमगाव केतकी गावचे माजी ग्रामपंचायत सदस्य माजी वैभव जाधव, नरसिंपूर गावचे माजी सरपंच श्रीकांत दंडवते, ओबीसी सेलचे युवक अध्यक्ष महेश जठार, उमेश क्षिरसागर, समीर देशमुख, हुसेन मुलाणी, गोरख पवार यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या प्रवेशाने तालुक्यात व जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. तालुक्यात होत असलेल्या पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपचे वजन वाढले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *