हडपसर (हवेलीनामा वृतसमूह) पुणे महानगरपालिका निवडणूक मतमोजणी प्रक्रियेसाठी व्यापक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असताना मतमोजणी दरम्यान काही उमेदवारांसोबत आलेल्या कार्यकर्त्यांनी जाणीवपूर्वक मोटारसायकलच्या सायलेंसरमध्ये अनधिकृत बदल करून ध्वनी प्रदूषण करणारा मोठा व कर्कश आवाज निर्माण केला, तसेच कर्कश हॉर्न वाजवून सार्वजनिक शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला. अशा प्रकारांमुळे मतमोजणी ठिकाणी गोंधळ व तणाव निर्माण होण्याची गंभीर शक्यता निर्माण झाली होती.त्यावर पोलीस बंदोबस्तावरील पोलीस अधिकारी व अंमलदारांनी तात्काळ व प्रभावी कारवाई करत एकूण १९ मोटारसायकल (त्यामध्ये बुलेट, यामाहा इत्यादी वाहनांचा समावेश आहे) ताब्यात घेतल्या असून संबंधित वाहनचालकांवर मोटार वाहन कायदा तसेच इतर लागू कायद्यांनुसार कठोर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. कारवाईत अंतर्गत उल्लंघन करणा-या संबंधितांकडून एकूण रुपये ९६७००/-इतका दंड वसूल करण्यात आला आहे.
वाहनांमध्ये बेकायदेशीर बदल करणे, कर्कश हॉर्नचा वापर करणे अथवा सार्वजनिक शांततेस बाधा आणणारे कृत्य करू नये असे याद्वारे पोलीस विभागाकडून तरूणांना आवाहन करण्यात येत आहे.
अशा कर्णकारकश्य आवाजाचे लोन पुणे शहरा लगतच्या ग्रामीण भागात देखील पोहोचले असून या गावांमधून बुलेटच्या सायलेन्सर मध्ये बदल करून मोठा आवाज काढून गाड्या पळविण्यामध्ये तरुणाईला स्वारस्य वाढल्याने शांतता भंग होत आहे याकडे मात्र पुणे शहर पोलिसांचे लक्ष नसल्याचे दिसून येते अशा बुलेट राजांवर देखील मोठी कारवाई अपेक्षित आहे असे स्थानिक नागरिकांनी मत व्यक्त केले.
ही कारवाई सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे, अतुलकुमार नवगिरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर संजय मोगले, पोनि (गुन्हे), निलेश जगदाळे, यांचे सुचनांप्रमाणे तपास पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उप निरीक्षक हसन मुलाणी, सत्यवान गेंड, अंमलदार दिपक कांबळे, भाऊसाहेब खटके, निलेश किरवे, बापु लोणकर, भगवान हंबर्डे, अनिरूध्द सोनवणे, अजित मदने, तुकाराम झुंजार, महेश चव्हाण, कुंडलीक केसकर, महाविर लोंढे, आकाश धावडे, विजय कानेकर, धिरज शेलार, यांचे पथकाने प्रशंसनीय कामगिरी केली आहे.
