अतुल देशपांडे,
सातारा(हवेलीनामाप्रतिनिधी). वडूज येथे सापडलेल्या बनावट खत प्रकरणात विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी प्रशासनाकडे हस्तक्षेप करीत असल्याच्या तक्रारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे आल्या आहेत. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून होत असलेल्या हस्तक्षेपामुळे शेतकऱ्यांच्या चुलीत माती ओतणाऱ्या भेसळखोरांना अभय मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे बनावट खत प्रकरणात कोणताही राजकीय हस्तक्षेप नको, अन्यथा स्वाभिमानीच्या वतीने बोंबाबोंब आंदोलन करण्यात येईल, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते अनिल पवार यांनी सांगितले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचीयेथे बैठक झाली. या वेळी संघटनेचे पदाधिकारी, तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते. त्या वेळी पवार बोलत होते. श्री. पवार म्हणाले, “बनावट डीएपीच्या प्रकरणाचे धागेदोरे पश्चिम महाराष्ट्रात पसरले आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि कृषी विभाग या प्रकरणाचा पाठपुरावा करीत आहे. मात्र, बनावट खत प्रकरणात दोषींवर कायदेशीर कारवाई होऊ नये, यासाठी चौकशीवर प्रभाव टाकण्याचे प्रयत्न सुरू असल्याच्या तक्रारी संघटनेकडे आल्या असून, हा प्रकार शेतकऱ्यांच्या भवितव्याशी खेळ करणारा आहे. या प्रकरणात प्रशासनासमोर राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी कोणताही हस्तक्षेप करू नये. दोषींवर कायद्याने कारवाई होऊ द्यावी. कोणी दबाव आणूनभेसळखोरांना वाचवण्याचा प्रयत्न केला, तर स्वाभिमानी शेतकरी संघटना संबंधितांच्या दारात जाऊन बोंबाबोंब आंदोलन करेल. प्रशासनाने दबावाला बळी न पडता कठोर कारवाई करावी.”
प्रशासनाने कोणत्याही दबावाला बळी न पडता खत नियंत्रण आदेश कायद्यानुसार दोषींवर तत्काळ कठोर कारवाई करावी. दोषी विक्रेत्यांचे परवाने रद्द करावेत, साठा जप्त करावा तसेच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी. बनावट खतविक्रीमुळे अंडचणीत असलेल्या शेतकऱ्यांच्या उत्पादनावर व भवितव्यावर गंभीर परिणाम झाला असून, या प्रकरणात राजकीय दबाव न ठेवता प्रशासनाने शेतकऱ्यांच्या बाजूने ठाम भूमिका घ्यावी, असेही ते म्हणाले.
