किरण खुडे
राजगुरूनगर (हवेलीनामा प्रतिनिधी) : येथील हुतात्मा राजगुरू महाविद्यालयातील मराठी विभागाच्या वतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचे औचित्य साधून ‘माझी मराठी स्वाक्षरी’ हा अभिनव उपक्रम राबविला.
या प्रसंगी खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲड. देवेंद्र बुट्टे पाटील, उपाध्यक्ष नानासाहेब टाकळकर, नगरसेवक दिनेश सांडभोर, स्नेहल राक्षे, संचालक बाळासाहेब सांडभोर, हिरामण सातकर, मच्छिंद्र राक्षे, प्राचार्य डॉ.शिरीष पिंगळे, उपप्राचार्य डॉ. संजय शिंदे, प्रबंधक नारायण शिंदे उपस्थित होते.

उपस्थितांनी मराठी स्वाक्षरी करून आपले माय मराठीबद्दलचे प्रेम, आदरभाव व्यक्त केला. महाविद्यालयातील दर्शनी भागात मांडणी केलेल्या फलकावर विद्यार्थ्यांनी कल्पक सृजनातून आपापल्या मराठी स्वाक्षरी साकारल्या. महाविद्यालयातील सर्वच विद्याशाखांमधील विद्यार्थ्यांनी या उपक्रमात उत्साहाने सहभाग नोंदविला.
या प्रसंगी बोलताना संस्थाध्यक्ष ॲड. देवेंद्र बुट्टे पाटील म्हणाले, की मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आणि मराठी अस्मितेच्या जतनासाठी मराठी स्वाक्षरी हा एक महत्त्वाचा सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम आहे. मराठी भाषेचा अभिमान मनात बाळगून सर्वांनी आपल्या मातृभाषेतून स्वाक्षरी करावी, असे आवाहन त्यांनी केले.

साहेबरावजी बुट्टेपाटील स्मृतीदिनानिमित्त घेण्यात आलेल्या हस्ताक्षर स्पर्धेत वरिष्ठ गटात प्रथम क्रमांक प्रार्थना यादव, द्वितीय क्रमांक दुर्गा सातपुते, तृतीय क्रमांक साक्षी उखंडे यांचा आला तर कनिष्ठ गटात आदिती गाढवे, आदिती वरकड, करण मानकर, श्रावणी मांजरे आणि अनुष्का नाईकडे यांचा गुणानुक्रमे क्रमांक आला. या गुणवंत विद्यार्थ्यांचा पुस्तक व अभिजात मराठी कवितेची प्रतिमा देऊन गौरव करण्यात आला.
ह्या उपक्रमाचे आयोजन मराठी विभाग प्रमुख डॉ. संजय शिंदे, डॉ. बाळासाहेब अनुसे, प्रा. पार्थ खाडीलकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. बाळासाहेब अनुसे यांनी तर आभार डॉ. संजय शिंदे यांनी मानले.
