किरण खुडे
राजगुरूनगर (हवेलीनामा प्रतिनिधी) : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खेड तालुक्यात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली असून, निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, शांततेत व निर्भय वातावरणात होण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. या निवडणुकीसाठी खेड तालुक्यात ३३७ मतदान केंद्रांची उभारणी करण्यात आली आहे. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अनिल दौंडे यांनी दिली.
जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार प्रशांत बेडसे, नायब तहसीलदार रवींद्र मोरे व चेतन मोरे उपस्थित होते. तर गटविकास अधिकारी विशाल शिंदे यांची आदर्श आचारसंहिता प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
निवडणूक प्रक्रियेसाठी एक खिडकी प्रणाली उभारण्यात येणार असून, प्रचार, सभा, मिरवणुका व इतर कार्यक्रमांसाठी आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या याच प्रणालीद्वारे दिल्या जाणार आहेत. मतमोजणी व निवडणूक साहित्य साठवणुकीसाठी हुतात्मा राजगुरू क्रीडा संकुलात आवश्यक अशी व्यवस्था करण्यात आली आहे.
सर्व राजकीय पक्ष व उमेदवारांना आदर्श आचारसंहितेबाबत सविस्तर सूचना देण्यात आल्या असून, उमेदवारी अर्ज दाखल करताना सूचक हा संबंधित गट किंवा गणातीलच असणे बंधनकारक राहणार आहे.
निवडणुकीच्या काळात फ्लेक्स, प्रचार वाहने व सार्वजनिक कार्यक्रमांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. नगरपरिषद हद्दीतील परवानगी न घेतलेल्या फ्लेक्सवरही कारवाई केली जाणार असून, नवीन फ्लेक्स लावण्यास पूर्णतः मनाई करण्यात आली आहे. मात्र गाव पातळीवरील जत्रांमधील बैलगाडा शर्यती, लोकनाट्य तमाशा व ऑर्केस्ट्रा कार्यक्रमांना परवानगी दिली जाईल. तथापि, या सर्व कार्यक्रमांमध्ये आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करणे बंधनकारक राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
निवडणूक खर्चावर प्रशासनाकडून कठोर नियंत्रण ठेवले जाणार आहे. जिल्हा परिषद उमेदवारासाठी नऊ लाख रुपये, तर पंचायत समिती उमेदवारासाठी सात लाख रुपये इतकी खर्च मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवसापासून खर्चाची नोंद ठेवली जाणार असून, उमेदवारांच्या सर्व हालचालींवर विशेष लक्ष ठेवले जाणार आहे. आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
मतदारांमध्ये विशेषतः महिलांचा सहभाग वाढावा यासाठी पिंक मतदान केंद्रांची उभारणी करण्यात येणार आहे. तसेच मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी विविध जनजागृती उपक्रम व पथनाट्यांचे आयोजन केले जाणार आहे. दुबार मतदारांच्या बाबतीत बीएलओमार्फत संपर्क साधून योग्य मतदान केंद्र निश्चित केले जाणार आहे.
सध्या तालुक्यातील कोणतेही मतदान केंद्र संवेदनशील घोषित नसले, तरी तक्रारी प्राप्त झाल्यास तात्काळ पाहणी करून योग्य निर्णय घेतला जाईल. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस विभागामार्फत तडीपार प्रस्ताव, बंदपत्र यांसारख्या प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच दारूबंदी, भेसळयुक्त दारू, विनापरवाना वाहतूक यावर कठोर कारवाई केली जाणार असून, घातक शस्त्रे जमा करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
