थेऊर (हवेलीनामा वृतसमूह) लौकिक सुखामध्ये आनंद नाही तर अलौकिक सुख प्राप्त करण्यासाठी धर्माचे पालन करून ऋषि, महर्षी,साधुसंत यांनी सांगितलेल्या मार्गावर मार्गक्रमण करून ग्रंथांचे पठण करून त्याचा अर्थ जाणून घेऊन मार्गक्रमण केल्यास अलौकिक सुखाचा आनंद प्राप्त होतो. लौकिक धना मुळे आनंद प्राप्त होतो ही खुळी कल्पना आहे असे असते तर धनाड्य व्यक्ती या जगात आनंदात राहिले असत्या परंतु तसे दिसत नाही कारण खरा आनंद हा धनाने मिळवता येत नाही.इष्ट बुध्दी अर्थात देव बुद्धीच आपल्याला इच्छित फळ प्राप्त करून देते. मनुष्य जन्म दुर्लक्ष आहे या भवसागरातून पार होण्यासाठी मृत्यू लोकातच जन्म घ्यावा लागतो अन्य कुठल्याही जन्मातून या भवसागरातून मुक्त होण्याचे कुठलेही साधन नाही. ग्रंथ,गुरु आणि गीता ही त्रिसूत्री अतिशय महत्त्वाची असून जड आणि चेतन याची गाठ सोडवण्यासाठी गुरु महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो यासाठी शोत्रीय व ब्रह्मनिष्ठ गुरूच्या चरणी लीन झाल्यास आपले कल्याण होणार असे जगद्गुरु स्वामी श्री सदानंद सरस्वती जी महाराज यांनी आपल्या आशीर्वाचनात श्रीक्षेत्र थेऊर या ठिकाणी सांगितले. ते म्हणाले की, आपल्या सनातन धर्मामध्ये पाच देवतेंची पूजा महत्त्वाची मानली जाते यात भगवान गणेश यांची प्रथम पूजा केली जाते आणि हा गणेश भगवान भक्तांच्या भावाचा भुकेला आहे तसेच आपापल्या कुलदेवतेच्या उपासनेमध्ये आपण राहिले पाहिजे यासाठी आपल्या वडिलोपार्जित ज्या देवतांची पूजा अर्चा केली जाते त्या देवतेच्या चरणी कायम लीन असावे असे जगद्गुरुंनी यावेळी सांगितले.

अष्टविनायकांपैकी एक तीर्थक्षेत्र असलेल्या श्री क्षेत्र थेऊर या ठिकाणी द्वारका शारदा पिठाचे जगद्गुरु शंकराचार्य श्री सदानंद जी महाराज यांचे श्री चिंतामणी गणपती दर्शन योग निमित्ताने आगमन झाले या सुवर्णमयीम संधीचा परिसरातील भाविकांनी लाभ घेतला श्री जगद्गुरु शंकराचार्य यांच्या परम सानिध्याचा व संदेशाचा भाविकांना लाभ झाला.

महाराष्ट्रात एकूण आठ विनायकांची धर्मपिठे असून यास अष्टविनायक या नावाने संबोधले जाते महाराष्ट्रासह देशाच्या कानाकोपऱ्यातून अनेक भाविक या अष्टविनायक यात्रेसाठी येत असतात देशातील वेगवेगळ्या शक्तीपीठांपैकी अष्टविनायक गणपती यांचे अनन्यसाधारण महत्त्व असून या ठिकाणी साधुसंत,महंत श्री गणराया चरणी लीन होत असतात असाच योग द्वारका शारदा पिठाचे जगद्गुरु शंकराचार्य श्री सदानंद जी महाराज यांचे थेऊरक्षत्री आगमन झाले त्यांच्या स्वागताची तयारी चिंचवड देवस्थान कडून करण्यात आली होती आणि स्वागत समयी अनेक मान्यवर श्री चिंतामणी गणपती मंदिरात उपस्थित होते. यामध्ये उद्योजक जयंत म्हैसकर, चिंचवड देवस्थानचे मुख्य विश्वस्त मंदार देव, श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान चे मुख्य विश्वस्थ योगी निरंजनाथ, विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट चे बाळकृष्ण कवडे, रांजणगाव गणपती चे मुख्य विश्वस्त ओंकार देव, लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संजय ढेकणे, महाड गणपती देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त किरण काशीकर, बल्लाळेश्वर देवस्थान पाली चे मुख्य विश्वस्त जितेंद्र गद्रे,याचप्रमाणे मार्तंड देवस्थान ट्रस्ट जेजुरी व भाग्यश्री प्रसादराव पाटील,, माधवी गोडबोले, सद्गुरु ग्रुप चे अध्यक्ष यशवंत कुलकर्णी चिंचवड देवस्थानचे विश्वस्त जितेंद्र देव, केशव विद्वांस, राजेंद्र उमाप, देवराज डहाळे तसेच चिंतामणी गणपती चे पुजारी महेश आगलावे आणि वेगवेगळ्या गावातून आलेले मान्यवर व्यक्ती व मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.

श्रीच्या शंकराचार्य पादुका पूजन जयंत म्हैसकर यांच्या हस्ते करण्यात आले तर पौरोहित्य मिलिंद पेंडसे,आदित्य पेंडसे, मंदार शहरकर,अरुण भोसेगावकर, आनंद जवळेकर यांनी केले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक चिंचवड देवस्थानचे विश्वस्त केशव विद्वांस यांनी केले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *