अर्जुन मेदनकर,
आळंदी (हवेलीनामा प्रतिनिधी) अखिल वारकरी भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र आळंदी देवाची येथील इंद्रायणी नदीच्या प्रदूषणात प्रचंड वाढ झाल्याने भाविकांच्या श्रद्धेस बाधा निर्माण होत आहे राज्यासह देशातील मुख्य नद्यांच्या प्रदूषणाचा विषय खूपच गंभीर बनत असला तरीही आळंदी येथील इंद्रायणी नदी ही भाविकांचं श्रद्धास्थान आहे त्यामुळे या पवित्र आधीचे पावित्र्य जतन करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी राज्य शासनाच्या प्रदूषण नियंत्रण मंडळावर आलेले आहे त्यामुळे राज्याच्या जलसंपदा मंत्री तथा प्रदूषण नियंत्रण विभागाने याकडे तातडीने लक्ष देऊन या नदीचे पाणी पूर्ववत कसे होईल याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
भारतीय सनातन धर्म परंपरेनुसार तीर्थक्षेत्री पवित्र स्नान हा एक महत्त्वपूर्ण आणि श्रद्धेचा भाग समजला जातो त्यामुळे लाखो भाविक अशा तीर्थक्षेत्री असलेल्या पवित्र नद्यांचे स्नान करून त्या ठिकाणी असलेल्या देवतेची पूजा अर्चा मनोभावे भक्ती भावाने करतात म्हणून या भावनेचा आदर करून श्री क्षेत्र आळंदी येथील पवित्र शाह इंद्रायणी नदीच्या जलशुद्धीकरणाची जबाबदारी सर्वस्वी राज्य शासनावर असल्याने याकडे त्वरित लक्ष घालून या नदीचे पाणी पूर्वपदावर कसे आणता येईल हे महत्त्वाचे आहे.
शहरांचे नागरिकीकरण विस्तारताना शहरातून वाहणाऱ्या नाल्यांचे पाणी तसेच छोट्या-मोठ्या उद्योग समूहातून येणारे रसायनिक पाणी सरळ नदी पात्रात सोडले जाते त्यामुळे या नदीच्या प्रदूषणामध्ये वरचेवर वाढ होत आहे. शहरात तयार होणारे गटाराचे पाणी शुद्धीकरण प्रक्रिया केल्यानंतरच नदीपात्रात सोडण्याची व्यवस्था असणे आवश्यक आहे परंतु बहुतांश शहरांमध्ये अशा प्रकारची व्यवस्था असल्याचे दिसून येत नाही आणि ज्या ठिकाणी ही व्यवस्था आहे ती केवळ कागदोपत्री असल्याचे दिसून येते.
