किरण खुडे
राजगुरूनगर : (हवेलीनामा प्रतिनिधी) : येत्या प्रजासत्ताक दिनापासून राजगुरूनगर शहराला दररोज नियमीत व सुरळीत पाणीपुरवठा सुरू होईल. अशी घोषणा नवनिर्वाचित लोकनियुक्त प्रथम नगराध्यक्ष मंगेश गुंडाळ यांनी पदग्रहण समारंभात केली.
येथील राजगुरुनगर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षांचा पदग्रहण समारंभ व उपनगराध्यक्षांची निवडणूक सोमवारी (ता. १२) नगरपरिषद कार्यालयात झाली. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी गटनेते व उपनगराध्यक्ष मनोहर सांडभोर, माजी जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख, भगवान पोखरकर व नवनिर्वाचीत सर्व नगरसेवक उपस्थित होते.

पुढे बोलताना ते म्हणाले, राजगुरुनगरवासीयांना गेल्या अनेक दिवसांपासून दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. ही मोठी समस्या आहे. ती सोडविण्यास मी प्राधान्य दिले आहे. नियमीत पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन, मैला शुद्धीकरण, रस्ते आदी अनेक प्रश्न प्रामुख्याने सोडविणे आवश्यक आहे. गेल्या वीस दिवसांपासून मी यावर उपाययोजना करण्यासाठी योग्य पावले उचलली आहेत. लवकरच मी व आमचे सर्व नगरसेवक या विषयांवर ठोस निर्णय घेऊन काम करणार आहोत. मी माझा पुर्ण वेळ शहराच्या विकासासाठी देण्यासाठी कटीबद्द असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
नगरपरिषदेत सत्ताधारी असलेल्या शिवसेनेच्या गटनेतेपदी व उपनगराध्यक्षपदी मनोहर सांडभोर यांची निवड यावेळी झाली.
नगराध्यक्षपदी शिवसेनेचे मंगेश गुंडाळ निवडून आले आहेत. तसेच, नगरपरिषदेत २१पैकी सर्वाधिक १० नगरसेवक शिवसेनेचे निवडून आलेले आहेत. त्यानंतर शिवसेनेने दोन अपक्षांना बरोबर घेऊन नगरसेवकांचा गट तयार केला.
तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी वैभव घुमटकर यांची निवड करण्यात आली. स्वीकृत नगरसेवक म्हणून सचिन मधवे आणि सागर सातकर यांचे अर्ज दाखल झाले होते. त्यांच्याही निवडी यावेळी झाल्या. याप्रसंगी अतुल देशमुख, भगवान पोखरकर यांची भाषणे झाली. याप्रसंगी मुख्याधीकारी अंबादास गर्कळ व नागरीक उपस्थित होते.
