अतुल देशपांडे,
सातारा (हवेलीनामा प्रतिनिधी ).पत्नी ऋतुजाच्या प्रसुती आनंदासाठी व येणाऱ्या बाळाच्या पहिल्या रडण्याचा साक्षीदार होण्यासाठी प्रमोद देशाच्या सीमेवरुन घरी आला पण नियतीला काही वेगळंच मंजूर होतं. रात्री एका भीषण अपघाताने त्याचा श्वास थांबला आणि काही तासांतच घरी कन्यारत्नाचा जन्म झाला. ज्या डोळ्यांतून लेकीच्या स्वप्नांची पहिली झलक पहायची होती, ते डोळे कायमचे मिटले. वडिलांच्या कुशीत खेळण्याआधीच ती चिमुकली पोरकी झाली. एकीकडे घरात पाळणा हलला अन् त्याचवेळी दुसरीकडे स्मशानात चिता पेटली होती. आनंद आणि दुः ख यांचं असं भयाण वास्तव काळीज पिळवटून गेलं.
भारतीय सैन्य दलात (Indian Army) कार्यरत असलेला जवान पत्नीच्या डिलिव्हरीसाठी सुट्टीवर गावी आला असताना त्याचा अपघाती मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना साताऱ्यात घडली आहे. सिकंदराबाद-श्रीनगर येथे भारतीय सैन्य दलात सेवा बजावणारे सातारा तालुक्यातील दरे गावचे वीर जवान प्रमोद परशुराम जाधव यांचा अपघातात जागीच मृत्यू झाला. या घटनेने दरे गावासह संपूर्ण जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.प्रमोद जाधव पत्नीच्या प्रसूतीसाठी ते सुमारे आठ
दिवसांपूर्वी सुट्टी घेऊन गावी आले होते. घरात आनंदाचे वातावरण होते. पत्नी गरोदर होती आणि लवकरच कुटुंबात नवा पाहुणा येणार होता. मात्र, नियतीला काही वेगळेच मान्य होते. एका भीषण रस्ता अपघातात प्रमोद जाधव यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ज्या घरात लवकरच जल्लोष होणार होता, त्याच घरावर अचानक दुःखाचा डोंगर कोसळला.
काही कामानिमित्त दुचाकीवरुन वाढे फाट्याच्या दिशेने जात असताना, आयशर टेम्पोने जाधव यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची बातमी समजताच कुटुंबीयांसह संपूर्ण गावावर दुःखाचा डोंगर कोसळला.मृत्यूनंतर काही तासांतच लेकीचा जन्म झाला.
सकाळी प्रमोद जाधव यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी दरे येथे आणण्यात आले. पार्थिव गावात दाखल होताच एकच आक्रोश झाला. “अमर रहे, अमर रहे, प्रमोद परशुराम जाधव अमर रहे” या घोषणांनी परिसर दुमदुमला. विशेष म्हणजे, याच वेळेत त्यांच्या पत्नीने एका गोंडस मुलीला जन्म दिला. घरातील कर्त्या पुरुषाचा मृत्यू आणि पाहुण्याचे आगमन, या परस्परविरोधी दृष्याने संपूर्ण गावाला अश्रू अनावर झाले.
शनिवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास प्रमोद यांना कन्यारत्न झाले. मात्र मुलीचे तोंड पाहण्याआधीच पित्याचा मृत्यू झाल्याच्या घटनेने हा परिवार तसेच परळी खोरं अक्षरशः गहिवरुन गेलं, गलबलून गेलं. प्रत्येक जण हळहळला.जवान प्रमोद जाधव यांचा ऋतुजासोबत ५ वर्षांपूर्वी विवाह झाला होता. पत्नी गरोदर राहिल्यानंतर ते पत्नीची हरत-हेची काळजी घेत होते. प्रमोद यांच्या ३ बहिणी देखील सर्व ती खबरदारी घेत होत्या. पत्नी ऋतुजाची दवाखान्यातील नियमित तपासणी, सोनोग्राफी याची ते प्रत्येकवेळी माहिती घेत. डॉक्टरांशी फोनवरुन व समक्ष सर्व ती माहिती व पथ्ये विचारत होते, अशी माहिती साई नर्सिंग होमच्या डॉ. स्नेहांजली महामुनी यांनी दिली.
