पुणे (हवेलीनामा वृतसमूह) राज्यात महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी उडाली असून मतदारांना विविध प्रलोभनातून आपल्याकडे भुलविण्याची स्पर्धा लागली आहे. महायुतीतील मित्रपक्ष एकमेकांपुढे दंड ठोकून उभे ठाकले आहेत. काही ठिकाणी एकत्र तर काही ठिकाणी विरोधात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यासर्व लढायामध्ये अजित पवार यांनी आपली सर्व ताकद पुण्याच्या दोन्ही महानगरपालिकावर केंद्रित केले आहे.
भाजप आणि शिवसेना हे मुंबई ठाणे आदी ठिकाणी एकत्र लढत आहेत. परंतु त्यांनी अजित पवार यांना एकटे सोडल्याचे दिसून येत आहे अशातच त्यांनी आपले काका शरद पवार याच्या राष्ट्रवादी कॉग्रेस सोबत एकत्र येत पुण्यात तगडे आव्हान उभे केले आहे, अजित पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागल्याने त्यांनी स्थानिक नेत्यांना चांगलेच डोक्यावर घेतले आहे. पिंपरी चिंचवड मधील भाजप आमदार महेश लांडगे यांना लक्ष करून निवडणुकीत मोठी रंगत आणली आहे.
आपल्या पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करत त्यांनी मतदारांना चांगलाच धक्का दिला. त्यांनी मोठी घोषणा केली की, आपली सत्ता आल्यावर पी एम पी बस आणि मेट्रो प्रवास मोफत करणार, या घोषनेची सर्वच स्तरातून चर्चा होते असून राजकीय पक्ष नेमक्या अशा घोषणा करून काय साध्य करु इच्छीतात. कारण गेल्या सहा महिन्यापूर्वी पी एम पी बस भाड्यात जवळपास दुप्पट वाढ झाली त्यावेळी सरकार मधील एक घटक पक्ष म्हणून जबाबदारी घेऊन सामान्य जनतेसाठी काही केलं असते तर आज सर्वसामान्य जनता आपल्या पाठीशी उभी राहिली असती. अशा घोषणा करण्याची वेळ आली नसती. अशी सर्वसामान्यांची भावना ऐकण्यात येत आहे.
