अतुल देशपांडे,

सातारा (हवेलीनामा प्रतिनिधी) हवामानातील सतत होणारेबदल आणि वाढलेली बोचरी थंडी यामुळे जिल्ह्यात व्हायरल इन्फेक्शनचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. शहरासह ग्रामीण भागात ताप, अंगदुखी, कणकण, सर्दी, खोकला, घसा दुखणे अशा तक्रारी घेऊन येणाऱ्या रुग्णांनी दवाखान्यांमध्ये मोठी गर्दी केली असून, खासगी व शासकीय रुग्णालये सध्या हाऊसफुल्ल झाल्याचे चित्र आहे.

विशेषतः पहाटे पडणारे दव, रात्री वाढणारी थंडी आणि दिवसा जाणवणारी उष्णता यामुळे तापमानात मोठी तफावत निर्माण झाली आहे. या बदलत्या हवामानाचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत असून, रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्याने व्हायरल आजार डोके वर काढत असल्याचे डॉक्टरांचेम्हणणेआहे.

लहान मुले, शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक तसेच मैदानी काम करणारे कामगार या आजाराला अधिक बळी पडत आहेत.

ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे आणि तालुका रुग्णालयांमध्येही ताप व सर्दी-खोकल्याच्या रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. काही ठिकाणी औषधोपचारासाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याचेही चित्र आहे.दरम्यान, साध्या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास आजार तीव्र होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी वेळीच उपचार घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

काय काळजी घ्यावी

थंडीपासून बचावासाठी उबदार कपड्यांचा वापर करा.गरम पाणी, सूप, वाफयुक्त पदार्थांचे सेवन करा.थंड पदार्थ व शीतपेये आदी कटाक्षाने टाळावीत.गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करण्यात यावा.दररोज पुरेशी झोप व विश्रांती घेणे आवश्यक.ताप, खोकला वाढल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.उपचारात दिरंगाई नकोबदलत्या हवामानामुळे व्हायरल इन्फेक्शनचे रुग्ण वाढत आहेत. ताप, सर्दी, खोकला, घसा दुखणे अशी लक्षणे जाणवताच स्वतःहून औषधे न घेता तत्काळ नजीकच्या आरोग्य केंद्रात तपासणी करून घ्यावी. लक्षणे लपवू नयेत आणि उपचारात दिरंगाई करू नये

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *