अतुल देशपांडे,
सातारा (हवेलीनामा प्रतिनिधी): एकसंघ स्वाभिमानी शेतकरी संघटना असताना शेतकऱ्यांच्या विविध प्रश्ना संदर्भात त्यांनी अनेक मोठी आंदोलने यशस्वी केली. पण कालांतराने याचे २ नव्हे तर ३ गट पडले. पण गुरुवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी व रयत शेतकरी संघटनेचे नेते, माजी मंत्री सदाभाऊ खोत पुन्हा एकत्र आले. सातारा न्यायालयात एका खटल्याच्या सुनावणीला त्यांनी हजेरी लावली. दोघेही एकाच वेळी न्यायालयात उपस्थित राहिले अन् त्या खटल्यातून निर्दोष मुक्तता केल्यानंतर दोघांच्याही चेहऱ्यावर समाधान पहायला मिळाले.
पाचवड फाटा (ता. कराड) येथे सन २०१४ साली ऊस दरासंदर्भात शेतकरी संघटनेचे एक मोठे आंदोलन झाले होते. त्यावेळी साताराजवळ एक बस जाळल्याची घटना घडली होती. त्याची तारीख सातारच्या कनिष्ठ न्यायालयात बरेच वर्ष झाली सुरू आहे. सध्या त्यांची तारीख निकालावर होती. म्हणून गुरुवारी माजी खासदार राजू शेट्टी व माजी मंत्री सदाभाऊ खोत सकाळी ११:३० च्या सुमारास सातारा न्यायालयात हजर होते. दोघांनी न्यायालयासमोर एकत्रितच हजेरी लावली. त्यानंतर न्यायालयाने निकाल सुनावत सर्वांची निर्दोष मुक्तता केली. त्यानंतर दोघेही एकाच लिफ्टने खाली आले. शेवटी एकमेकांचा निरोप घेत आपाआपल्या पुढील कामासाठी निघून गेले.
न्यायालयाने निर्दोष मुक्तता केल्यानंतर राजू शेट्टी, सदाभाऊ खोत यांनी शेतकरी संघटनेची ही केस न्यायालयात विनामोबदला चालविणाऱ्या अँड. विजय चव्हाण यांची भेट घेतली व त्यांचे मनापासून आभार मानले. यावेळी दोघांनीही अँड. विजय चव्हाण यांच्यासोबत एक फोटो घेतला. यावेळी सचिन नलवडे यांच्यासह शेतकरी संघटनेचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
