किरण खुडे

          राजगुरुनगर : (हवेलीनामा प्रतिनिधी) : येथील हुतात्मा राजगुरू महाविद्यालयातील मराठी विभागाच्या पदव्युत्तर व पीएच.डी. संशोधन केंद्रातील विद्यार्थ्यांनी सातारा येथे संपन्न झालेल्या शतकपूर्व ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास भेट दिली. विद्यार्थ्यांनी यावेळी शब्द, विचार आणि संस्कृतीचा उत्सव अनुभवला. संमेलनातील विविध उपक्रम जाणून घेतले. ग्रंथ विक्री दालनाला भेट देऊन पुस्तके हाताळली.‌ तसेच साहित्यिकांचा त्यांच्या साहित्यासह आढावा घेतला.

संमेलन स्थळी विविध मुलाखती, कवीकट्टा आणि परिसंवादांचा आनंद घेतला.‌ या संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ लेखक विश्वास पाटील यांचीही विद्यार्थ्यांनी भेट घेतली.‌‌ विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी वाचनसंस्कृतीचा संस्कार स्वतःवर करण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुस्तकांच्या सहवासात राहण्याचे आवाहन केले.‌ विद्यार्थ्यांनी खरेदी केलेल्या पुस्तकांवर त्यांनी स्वाक्षरी केली.‌ या संमेलनाच्या निमित्ताने साहित्यशारदेच्या उत्सवात सहभागी झाल्याबद्दल विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला.

या शैक्षणिक सहलीत विद्यार्थ्यांनी वाई येथील प्राज्ञपाठशाळेला भेट दिली तसेच महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या कार्यालयाला भेट देऊन मराठी भाषा आणि मराठी संस्कृतीच्या संवर्धनासाठी आणि प्रसारासाठी विश्वकोश निर्मितीचे कार्य समजून घेतले. या शैक्षणिक सहलीचे आयोजन प्राचार्य डॉ. शिरीष पिंगळे, उपप्राचार्य व मराठी विभाग प्रमुख डॉ. संजय शिंदे, डॉ. बाळासाहेब अनुसे, प्रा. पार्थ खाडीलकर, प्रा. ओंकार टाकळकर यांनी केले.‌

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *