अतुल देशपांडे

सातारा (हवेलीनामा प्रतिनिधी). सोलापूर शहरातील खुनाच्या गुन्ह्यातील फरारी असलेल्या चार संशयितांना तासवडे टोल नाक्यावर तळबीड पोलिसांनी सापळा रचून अटक केली. शनिवारी रात्री सुमारे अकराच्या सुमारास ही कारवाई झाली. संशयितांना पुढील तपासासाठी सोलापूर पोलिसांच्या ताब्यात दिले.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत उमेदवारीच्या वादातून दोन दिवसांपूर्वी एका व्यक्तीचा खून झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणात काही संशयितांना अटक करण्यात आली होती. मात्र, त्यातील शंकर बाबू शिंदे, सुनील शंकर शिंदे, आलोक तानाजी शिंदे (सर्व रा. रविवार पेठ, सोलापूर) आणि महेश शिवाजी भोसले (रा. माळेवाडी, ता. माळशिरस) हे चौघे संशयित फरारी होते. खुनाच्या घटनेनंतर संबंधित चारही संशयित मोटारीतून आनेवाडी टोल नाका ओलांडून कऱ्हाडच्या दिशेने जातअसल्याची माहिती सोलापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक काळे व त्यांच्या पथकाला मिळाली. त्यांनी ही माहिती पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांना दिली. त्यांनी तत्काळ तळबीड पोलिस ठाण्याचे अधिकारी किरण भोसले यांना सूचना देऊन तासवडे टोल नाक्यावर नाकाबंदी करण्याचे आदेश दिले. तळबीड पोलिसांनी नाकाबंदी करत संशयित वाहनांची तपासणी केली. यावेळी चारही संशयित पोलिसांच्या जाळ्यात सापडले. त्यांनी संबंधित संशयितांना अटक करून तपासासाठी सोलापूर पोलिसांच्या ताब्यात दिले.

पोलिस अधीक्षक दोशी, अतिरिक्त पोलिस अधीक्षक वैशाली कडुकर, पोलिस उपअधीक्षक राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक भोसले, फौजदार रजपूत, अभय मोरे, प्रवीण गायकवाड, सुशांत कुंभार व शीतल मोहिते यांनी ही कारवाई केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *