अतुल देशपांडे,
सातारा (हवेलीनामा प्रतिनिधी) जोपर्यंत स्त्रियांची मुक्ती, तसेच जातिव्यवस्थेचा खातमा होत नाही, तोपर्यंत आमचा लढा चालूच राहील. सरकार बदलली, तरी जीवनात समतेवर आधारलेली समृद्धी येत नाही, तोपर्यंत लढतच राहू, असे प्रतिपादन श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांनी केले.
भांबे येथे सुरू असलेल्या श्रमिक मुक्ती दलाच्या खुल्या अधिवेशनाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. राज्याध्यक्ष वाहरू सोनवणे, कार्याध्यक्ष कॉ. संपतदेसाई, अॅड. कृष्णा पाटील, कॉ. जयंत निकम, संतोष गोटल, मोहन अनपट, अॅड. शरद जांभळे, दिलीप पाटील, डी. के. बोडके, सुधीर नलवडे, मेजर सुखदेव बन, विठ्ठल डांगरे उपस्थित होते.
डॉ. पाटणकर म्हणाले, “कुठलेही सत्तेचे पद नसताना, कुठल्याही भांडवली कंपन्यांकडून निधी न घेता केवळ कष्टकरी जनतेला संघटित करून हवा, पाणी, जमीन, पुनर्वसन याबाबत सरकारला नवीधोरणे घ्यायला भाग पाडणारी संघटना म्हणजे, श्रमिक मुक्ती दल आहे. श्रमिक कष्टकरी जनतेच्या बाजूने नवा इतिहास आपण घडवला आहे.
या इतिहासाच्या खांद्यावर उभे राहून नव्या प्रश्नांना आपल्याला गवसणी घालायची आहे.”कॉ. देसाई म्हणाले, “दोन दिवसांत आपण पाणी, धरणग्रस्त चळवळीचा आढावा अधिवेशनात घेतला. जातीय अत्याचार आणि स्त्रियांवरील अत्याचारात वाढ होत आहे. त्यामुळे स्त्री मुक्ती चळवळ आणि जातीमुक्ती चळवळ तीव्र करण्याचा निर्णय आपण या अधिवेशनात घेतला आहे. जे ठरलं ते आपण निर्णायक लढाई करून यशस्वी करूया.”
प्रा. लक्ष्मण शिंदे म्हणाले, “श्रमिक मुक्ती दलाने अनेकांना लिहायला, बोलायला शिकविले. ही चळवळ वाढली पाहिजे, कारण ही मातीशी जोडलेली चळवळ आहे. यावेळी राज्याध्यक्ष वाहरू सोनवणे, जयंत निकम, विष्णू मोरे यांनीही मनोगत व्यक्त केली. संतोष गोटल यांनी सूत्रसंचालन केले.
