किरण खुडे
राजगुरुनगर : (हवेलीनामा प्रतिनिधी) : शहरातील होलेवाडी परिसरात अज्ञात चोरट्यांनी बंद सदनिकेत घरफोडी करत सुमारे ७० लाख रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिणे व रोख रक्कम लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी खेड पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत खेड पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजगुरूनगर येथील होलेवाडी – पाबळरस्त्यावरील श्री अपार्टमेंट येथील सदनिकेत राहणारे व्यापारी व शेतकरी मोतीलाल कांतीलाल गदीया (वय ५९) यांनी खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ते कुटुंबियांसह धार्मिक कार्यक्रमासाठी बाहेरगावी गेले होते. या दरम्यान हि घटना घडली. शुक्रवारी (दि. २ ) रात्री ८ वाजल्यापासून ते शनीवारी (दि.३ ) दुपारी १.१५ वाजेच्या दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या सदनिकेच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला.
चोरट्यांनी घरातील कपाटे उचकटून त्यामध्ये ठेवलेले सोन्याचे व चांदीचे दागिने, रोख रक्कम तसेच टायटन कंपनीची घड्याळे असा मौल्यवान ऐवज चोरून नेला. या चोरीत स्नेहल गदीया, राखी गदीया व कविता गदीया यांचे विविध प्रकारचे सोन्याचे हार, मंगळसूत्र, बांगड्या, चैन, अंगठ्या, चांदीची भांडी यांसह एकूण ९ लाख ५० हजार रुपये रोख रक्कम चोरीस गेली आहे.
संपूर्ण चोरी गेलेल्या मालाची अंदाजे किंमत ₹६८,०२,०००/- इतकी असून, यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी खेड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्याची नोंद पोलीस उपनिरीक्षक गरड यांनी घेतली असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण करीत आहेत. घटनेतील ई-साक्ष नोंदविण्यात आली असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू आहे.
या घटनेमुळे राजगुरूनगर परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरीकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन पोलीसांनी केले आहे.
