किरण खुडे
राजगुरुनगर : (हवेलीनामा प्रतिनिधी) : सुरक्षीत सेवा आणि विनाअपघात कामगिरी हे एसटी बस चालकांचे आद्यकर्तव्य आहे. असे मत येथील राजगुरुनगर एसटी आगाराच्या वरीष्ठ आगारव्यवस्थापक विद्या कदम यांनी येथे प्रतिपादन केले.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या राजगुरुनगर एसटी आगारात आयोजीत सुरक्षितता अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपिठावर कनिष्ठ आगारव्यवस्थापक उज्वला कुटे, वाहतूक निरीक्षक नासिर हवालदार, आगार लेखाकार हिरामण दिघे, खेड तालुका पत्रकार संघाचे सचिव किरण खुडे, वाहतूक नियंत्रक विष्णू राठोड उपस्थित होते.

पुढे बोलताना कदम म्हणाल्या, अपघात माणसांकडून होतात. प्राणी, पक्षी यांच्याकडून कधीही अपघात होत नाही. म्हणजेच आपल्या कृतीवर प्राणी पुर्णतः केंद्रीत होऊन काम करत असतात. त्याचप्रमाणे वाहन चालविताना चालकाने कामावर पुर्णतः केंद्रीत होऊन काम केल्यास अपघातांचे प्रमाण कमी होऊन आपण महामंडळाच्या व प्रवाशी जनतेच्या सेवेत आणखी लोकाभिमुख सेवा देऊ शकतो. राज्यातील अनेक आगारात अपघाताचे प्रमाण शुन्यावर आले आहे. ही गौरवास्पद गोष्ट असल्याचेही त्यांनी सांगितले.
उज्वला कुटे म्हणाल्या, ज्यावेळी एखादा अपघात होतो, त्यावेळी एखाद्या कुटुंबांची मोठी हानी होते. तरीही नाईलाजास्तव अशी घटना घडल्यास त्या कुटुंबांला भरपाई द्यावीच लागते शिवाय संस्थेच्या प्रतिमेचेही नुकसान होते. यासाठी स्वयंशिस्त व जबाबदारी यांचे भान राखून कर्तव्य करावे.

किरण खुडे यांनी कर्मचाऱ्यांना निर्व्यसनी राहुन जननी जन्मभूमी प्रमाणे एसटी या आपल्या मातृसंस्थेची व प्रवाशांची प्रामाणिक सेवा करण्याविषयीचे आपल्या भाषणात सांगितले. तर हिरामण दिघे यांनी मानसिकता सकारात्मक असल्यास नित्य कर्तव्यात कर्मचारी प्रामाणिक राहतो असे सांगितले.
कार्यक्रमापूर्वी मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले. उत्कृष्ट विनाअपघात कामगिरी करणाऱ्या चालकांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोविंद वर्ये यांनी केले. आभार विष्णू राठोड यांनी मानले.

कार्यक्रमासाठी लक्ष्मण वेट्टी, स्नेहा कातोरे, रोहीणी साबळे, स्वाती बिराजदार, पुष्पा चासकर, मनिषा सुतार, रंजना बिराजदार, विजया बगाटे, वाहतूक नियंत्रक गुलाब तिटकारे, बळीराम चव्हाण, राजेन्द्र नागरे आदी उपस्थित होते.
