किरण खुडे

राजगुरुनगर : (हवेलीनामा प्रतिनिधी) : येथील एका महाविद्यालयातील प्राध्यापकांनी मंदोशी (ता. खेड) येथे विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी (दि. २६) उघडकीस आली. प्रा. भानुदास मोतीलाल परदेशी (वय ५२, रा. मोशी शिवालय अपार्टमेंट, इंद्रायणी कॉलनी, ता. हवेली) असे त्यांचे नाव आहे. त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परदेशी हे राजगुरुनगर येथील त्यांच्या अध्यापनाचे काम संपवून महाविद्यालयातून बुधवारी (दि. २४) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून गेले. त्यानंतर त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. ते बेपत्ता झाल्याची शक्यता गृहीत धरून त्यांचा सर्वत्र शोध घेण्यात येत होता. गुरुवारी (दि. २५) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील मंदोशी येथील भैरवनाथ मंदिराच्या शेजारी असलेल्या विहिरीच्याजवळ त्यांची मोटारसायकल, काळ्या रंगाची बॅग व चपला आढळल्या.

खेड पोलिस व ग्रामस्थांच्या मदतीने त्यांचा विहीरीत शोध घेतला असता पहाटे दोन वाजण्याच्या दरम्यान परदेशी यांचा मृतदेह आढळला. यावरून त्यांनी आत्महत्या केल्याचे सांगितले जाते.

प्रा. परदेशी हे गेल्या बावीस वर्षांपासून येथील महाविद्यालयात जीवशास्त्र हा विषय शिकवित होते. त्यांच्या अचानक जाण्याने सर्वजण हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *