पुणे (हवेलीनामा प्रतिनिधी ) राज्यामध्ये धार्मिक पर्यटनांना अनन्या साधारण महत्त्व असून राज्याच्या विविध भागातून धार्मिक स्थळांना भेटी देणाऱ्या भाविकांची संख्या लक्षणीय आहे यामध्ये साडेतीन शक्तीपीठे व अष्टविनायक गणपती तीर्थक्षेत्रे यांचा या धार्मिक पर्यटनामध्ये महत्त्वाचा वाटा आहे राज्य मंत्रिमंडळामध्ये धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या उपायोजना तसेच सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला जातो परंतु हा निधी प्रत्यक्ष भाविकांच्या सुविधा उपलब्ध करण्यात कितपत वापरला गेला त्याचा भाविकांना किती उपयोग होतो आहे याचे ऑडिट कधी कुठल्या मंत्र्याकडून घेतल्याचे दिसून येत नाही.
अनेक धार्मिक ठिकाणी देवतांच्या दर्शनासाठी गेलेल्या भाविकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते अनेक ठिकाणी दर्शन बारीसाठी योग्य रांगेचे नियोजन नसते तसेच चप्पल स्टॅन्ड ची देखील उपलब्धता होत नाही त्यामुळे महागडी चप्पल बूट चोरीला जाण्याचे प्रमाण अधिक असते देवस्थानकडून या प्राथमिक सोयी सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. परंतु अनेक वेळेला गर्दीचा फायदा घेऊन वेगवेगळ्या मार्गाने भाविकांची पिळवणूक करण्याचा प्रयत्न अशा देवस्थानच्या ठिकाणी केला जातो आहे त्यामुळे धर्मादाय आयुक्त यांनी यात विशेष लक्ष घालून भाविकांना पुरविण्यात येणाऱ्या सोयी सुविधांकडे लक्ष दिले तर धार्मिक पर्यटनामध्ये आणखी वाढ होऊन स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होऊ शकतो राज्य शासन कोट्यावधी रुपये निधी उपलब्ध करून देतो त्या निधीचा उपयोग भाविकांच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी झाला तर हे पर्यटन आणखी चांगल्या पद्धतीने बहरेल अनेक ठिकाणचे प्रकल्प रेंगाळत पडल्याचे दिसून येते यावर शासनाने त्वरित निरीक्षक नेमून तीर्थक्षेत्रांची माहिती संबंधित विभागाला देऊन ही कामे पूर्णत्वास न्यावीत अशीच भाविकांची अपेक्षा आहे.
